नागपूर :- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्षमता बांधणी आयोग (सीबीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्षमता बांधणी कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेवर कौतुकाची थाप पडली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी यांच्या अध्यक्षतेत दिल्ली येथे गुरूवार ५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, उपायुक्त निर्भय जैन, माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक महेश धामेचा उपस्थित होते.
क्षमता बांधणी आयोगाच्या कार्याची नागपूर महानगरपालिकेत उत्तमरित्या अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी यांनी कार्यक्रमामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचा सन्मान केला. iGot Platform वर भारतातील एकुण 6 डेमो ULB असुन त्यात नागपूर, राजकोट, मैसुर, पुणे, अहमदाबाद, भुवनेश्वर महानगरपालिकेचा समावेश आहे. या सहा मनपामध्ये नागपूर मनपामर्फे सर्वाधिक Users Registration (1776), Active User (843) व सर्वाधिक Course Competition (3991) केल्याबद्दल नागपूर मनपा चे कैतुक करण्यात आले.
मिशन कर्मयोगी अंतर्गत संपूर्ण भारतातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी एकात्मिक दृष्टिकोन वाढवण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्षमता बांधणी आयोग (सीबीसी) यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला महानगरपालिका आयुक्त/शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकार, माहिती आणि उद्योग भागीदार, प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षक आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि क्षमता बांधणी आयोगाचे अधिकारी यांच्यासह 250 हून अधिक अधिकारी उपस्थित होते. निरंतर सुधारणांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन कौशल्ये सादर करणे यावर या कार्यशाळेत फलदायी संवाद आणि चर्चा झाली.
नागपूर महानगरपालिकेद्वारे अधिका-यांच्या कामामध्ये अद्ययावतता घडवून नाविन्यपूर्णत: आणण्याच्या दृष्टीने मनपामध्ये कार्यरत अभियंत्यांना मुंबई येथे क्षमता बांधणी कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. अधिका-यांच्या क्षमता बांधणीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आलेल्या पुढाकाराचा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस. पुरी यांनी आपल्या भाषणात उल्लेख करीत मनपाचे कौतुक आणि अभिनंदन केले.