नागपूर : राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे विविध विभागांतर्गत पदभरतीस बंदी होती. यामध्ये शिथिलता आल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदे भरण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये मुलाखती घेऊन मार्चमध्ये नेमणुका दिल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरती अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, मुलाखतीशिवाय विकल्पाच्या पदभरतीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ९ ऑगस्ट २०१९ रोजी पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आली. मुलाखतीशिवाय विकल्पांतर्गत निवड झालेल्या ५९७० पात्र उमेदवारांची निवड प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. मुलाखतीसह विकल्पाच्या पदभरतीसाठी २०६२ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे.
पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये १० नोव्हेंबर २०२२ मध्ये सुधारणा करण्यात आली असून शासन निर्णयानुसार शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित व्यवस्थापनास दर तीन महिन्यांनी पदभरती प्रक्रीया करण्याची मुभा दिलेली आहे. शिक्षकांच्या वैद्यकीय बिलासाठी मार्च 2023 मध्ये निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.