– श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामचे भूमिपूजन
नागपूर :- गायींची तस्करी आणि हत्या या संदर्भातील वाढत्या घटना म्हणजे समाजातील भयावहता दर्शविणाऱ्या आहेत. याबाबत प्रबोधनातून जागृती केली जातेच पण गोमातेचा जीव वाचविण्यासाठी अशा पुढाकाराची गरज आहे. कर्तव्याच्या जाणीवेतून समाजातील व्यक्तींनी पुढे येऊन श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची केलेली सुरुवात ही समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास माजी खासदार अजय संचेती यांनी व्यक्त केला.
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना करण्यात आली असून रविवारी २ जून रोजी माजी खासदार अजय संचेती यांच्या हस्ते गोरक्षण धामचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी महापौर तथा श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामचे अध्यक्ष संदीप जोशी, पराग सराफ, मोहगाव झिल्पीचे सरपंच प्रमोद डाखले, श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धाम संचालन समितीचे उपाध्यक्ष गुरदीपसिंग कपूर, सचिव योगेश पालीवाल, कोषाध्यक्ष अनिरुद्ध भगत, सदस्य आशिष विजयवर्गीय, सदस्य योगेश जोशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना अजय संचेती म्हणाले, गायींबाबत देशात सुरु असलेल्या व्यवस्थेमुळे प्रकल्पाला जागा देखील कमी पडेल हे नक्की पण या गोरक्षण धामच्या संचालनासाठी समाजाने देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणतेही प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते पुढे निरंतर सुरु ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे हा संदीप जोशी यांचा पिंड असल्याचे सांगत त्यांनी जोशी यांच्या कार्याचे कौतुक केले. इतर सर्व प्रकल्पांप्रमाणे श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धाम देखील निरंतर सुरु राहील, असा विश्वासही अजय संचेती यांनी व्यक्त केला.
हिंदू म्हणून गायींचा जीव वाचविण्यासाठी गोरक्षण धामची स्थापना
इंडिका गाडीच्या छोट्याश्या डिक्कीमध्ये ६ ते ७ गायींचे बछडे कोंबून घेऊन जाण्याची घटना मन विषन्न करणारी आहे. शाळेत आपण ‘गाय आपली माता आहे’ हे शिकलो, हिंदू संस्कृतीत गायीला आईचा दर्जा आहे असे आपण म्हणतो. पण हिंदू म्हणून आपण किती गायींचा जीव वाचवला हा प्रश्न आहे. इतिहासात आपली नोंद बघ्याच्या भूमिकेत नसावी यासाठी श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामची संकल्पना पुढे आली. आयुष्यभर जेवढ्या गायींचा जीव वाचविता येईल तेवढ्यांचा वाचवावा, याच हेतूने श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना करण्यात आली, अशी भावना माजी महापौर तथा श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धामचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या दीनदयाल थाली प्रकल्पाद्वारे आतापर्यंत २४ लक्ष नागरिकांना लाभ देण्यात आला. कोरोनाच्या संकटात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या संगोपनासाठी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाची सुरुवात केली. आज गोमातेच्या सुरक्षेसाठी गोरक्षण धामची सुरुवात होत असल्याचा आनंद मोठा आहे. गोरक्षण धाममधील गायींच्या पालन पोषणासाठी समाजातील व्यक्त्तींनी ‘एक घास गायीसाठी’ या भावनेने पुढे यावे, असे आवाहन देखील संदीप जोशी यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन नीरज दोंतुलवार यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले.