नागपूर :- सध्या राज्यभरात अजित पवार व छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांच्या शपथविधीमुळे नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. यांच्या शपथविधीशी राष्ट्रवादीचा काहीच संबंध नसल्याचं शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवार, दि.५ जुलै रोजी, दु. ०१:०० वाजता, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी, फ्रंटल सेल राज्यप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष, इतर पदाधिकारी यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
राज्यात नागपूरसह इतर जिल्ह्यात पाऊस, वीज, वारा, शेतीची कामे तसेच मुलामुलींची शैक्षणिक धावपळ मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व वरीष्ठ कार्यकर्त्यांना मुंबई वारी करणे शक्य नाही.
पक्षाच्या वतीने सभेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत ऑनलाईन सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीण चे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही सोशल मीडियाचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधत असतात.
सोशल मीडियाचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जनाधार वाढविला आहे.०५ जुलै २०२३ रोजी पक्ष कार्यालयात रोजी होणाऱ्या संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलणार आहेत. त्यांनी फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घ्याव्यात. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.