मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह रिध्दपूरचा सर्वांगिण विकास करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

राहुरी महानुभाव संस्थेच्यातर्फे महानुभाव संप्रदायामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. पिंपळा हुडकेश्वर येथील निळभट्ट भांडारेकार सभागृह येथे महावाक्य प्रवचन सोहळा समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे आमदार मुकेश चौधरी यांच्यासह महंत न्यायंबास बाबा, महंत कारंजेकर बाबा, महंत माहुरकर बाबा, महंत कापूसतळणीकर बाबा, महंत प्रकाशमणी विव्दांस बाबा, महंत वायंदेशकर बाबा, महानुभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश आवलगावकर, प्रवीणराज शास्त्री शेवलीकर तसेच उद्योगपती मनोज मलीक, सुखपाल सिंग, अजय ढवंगाळे आदी यावेळी उपस्थित होते.

उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्‍य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगौत्री रिध्दपूर ठरली आहे. महानुभाव पंथ हा कुप्रथा, व्यसनाधिनतेपासून दूर आहे. पारस्पारिक संबंध जपून शुध्दतेची जपणूक करण्याचे काम महानुभाव पंथाने केले आहे. या पंथाचा विस्तार देशासह विदेशातही आहे. यामुळेच रिध्दपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. लीळाचरित्रासारखे आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला तेथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे. चक्रधर स्वामी व त्यानंतरच्या गुरूंचा वैचारिक खजिना कालौघात नष्ट होऊ नये तर वाढावा, यासाठी या विद्यापीठाचे महत्त्व विशेष ठरणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.   

महानुभाव पंथातील व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी ‘श्रीनागदेवाचार्य जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार’ महंत दुतोंडे बाबा यांना तर महंत कारंजेकर बाबा यांना ‘आचार्यश्री गुर्जर शिवव्यास सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच महंत हंसराजदादा खामणीकर यांना ‘आचार्यश्री म्हाइंभट लेखक-संशोधक कृतज्ञता पुरस्कार’ तर, तपश्विनी छबीबाई पंजाबी यांना ‘आद्यकवयित्री महदंबा जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तसेच डॉ. विनोद पुसदेकर यांना ‘आचार्यश्री बाईदेवव्यास (भावेदवेव्यास) सेवा कृतज्ञता पुरस्कार’ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करुन शाल, श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. रमेश आवलगावकर लिखित ‘स्मृतीस्थळ’ या पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजेकर बाबा यांनी केले. संचालन प्रा. डॉ. कोमल ठाकरे तर आभार प्रवीणराज शास्त्री शेवलीकर यांनी मानले. पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद

Sun Dec 17 , 2023
– आत्मनिर्भर महिला स्वत:सोबत समाजाचेही कल्याण करतात – प्रधानमंत्री -विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यात राज्य व केंद्रीय मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती मुंबई :- आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!