नवी दिल्ली :- भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएच्या घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन पत्र सुपूर्द केलं. यानंतर आता मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 जूनला मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मोदी ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी संबंधित परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मोदींच्या शपथविधीआधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.