बुलडाण्यातील आंदोलक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा – अजित पवार

मुंबई :- सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के शेतकरी हा सोयाबीन उत्पादक आहे. देशाच्या सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास ४० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. साधारणत: सोयाबीन उत्पादनाचा प्रतीक्विंटल उत्पादन खर्च ५ हजार ७८३ रुपये आहे. सद्याचा बाजारभाव रु.५ हजार ते ५ हजार ५०० या दरम्यानच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला दरवाढ मिळावी यासाठी त्यांचे आंदोलन होते. कापूस पिकालाही यावर्षी ८ हजार १८४ रुपये उत्पादन खर्च आलेला आहे. तर सध्याच्या कापसाचा बाजारभाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० दरम्यानच आहे. सातत्याने सोयाबीन व कापसाच्या भावात चढउतार होत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठीचे हे आंदोलन होते. या आंदोलनानंतर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना स्थानबध्द करून त्यांना तातडीने दवाखान्यात नेले नाही. त्याऐवजी त्यांच्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांवर बेछूटपणे लाठी हल्ला केला त्यामध्ये ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांचा समावेश होता. तसेच तिथे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांनासुद्धा धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली एकंदरीत लाठी हल्ला हा पुर्व नियोजित कट होता असा आरोपही अजित पवार यांनी केला.

रविकांत तुपकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर अनेक विद्यमान व माजी विधानसभा सदस्यांना तुपकर यांना भेटू दिले नाही. सनदशीर मार्गाने होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशी कृत्ये केली जात असून पोलीस अधिकाऱ्यांचे मदतीने त्यांचेवर गंभीर गुन्ह्यातील कलमे लावण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी जाणूनबुजून त्यांना त्रास देत आहेत असेही अजित पवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Feb 28 , 2023
मुंबई : ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले. मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!