सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महानिर्मिती कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष वेतनावर कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेसाठी तातडीने पर्यायी अर्ज करावा

– परिपत्रक महानिर्मितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

नागपूर : कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील (EPS-95) सुधारणा नियमित आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सूट दिलेल्या आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार आहेत. महानिर्मितीचे जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ रोजी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना -१९९५ योजनेचे सदस्य होते/आहेत आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ अंतर्गत निवृत्ती वेतन प्रत्यक्ष वेतनावर घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना प्रत्यक्ष वेतनावर निवृत्ती वेतनाचा लाभ मिळविण्यासाठी नमुन्यात पर्यायी अर्ज आणि घोषणापत्र भरून जमा करावे लागणार आहे.जे कर्मचारी कोणताही विकल्प न देता, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही. ०३.०३.२०२३ पूर्वी पर्यायी अर्ज क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय, बांद्रा, मुंबई यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.महानिर्मितीत कार्यरत कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर, प्रत्यक्ष वेतनावरील कंपनीचा ८.३३ % वाटा विहित व्याजासह EPFO पेन्शन फंडात म.रा.वि.मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाद्वारे (MSEB CPF Trust) जमा करण्यात येणार आहे. ज्या माजी कर्मचाऱ्यांची अंतिम भ. नि. नि. ची पूर्ण रक्कम अद्यापही म.रा.वि.मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाकडे जमा असेल, अशा माजी कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम म.रा.वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळामार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

सन १९९५ पासून सर्व कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबतची सर्व माहिती सचिव, म.रा.वि. मंडळ, भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळ या विभागाकडून त्यांच्या पोर्टलवर (https://cpf1.mahadiscom.in/CpfWebProject/) CPF Dashboard Report मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ अंतर्गत पर्याय वापरून १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेच्या तरतुदीनुसार संरक्षित केले जातील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनासंबंधी पर्याय निवड करण्याकरीता संयुक्त पर्यायी नमुना अर्ज त्यांचे portal (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/member Interface Pohw/) वर जाहीर केलेला आहे.त्याकरीता, Pension Pay Order क्रमांकाची आवश्यकता असते. सदर PPO क्रमांकाबाबत माहिती करुन घेण्याकरीता परिपत्रकात नमूद केलेली खाली प्रक्रीया अवलंबिण्यात यावी.

महानिर्मिती कंपनीमधील भविष्य निर्वाह निधी अधिनियमानुसार निवृत्ती वेतनास पात्र असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत माहिती (अ) नव्याने लागू होणाऱ्या निवृत्ती वेतन संदर्भात माहिती. (ब) संबंधित कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतन योजनेकरीता भरावी लागणारी रक्कम .(क) नव्याने लागू होणारी निवृत्ती वेतनाची रक्कम इत्यादी बाबतची माहिती CPF Portal वर उपलब्ध आहे.

महानिर्मितीच्या सर्व विद्युत केंद्र/क्षेत्रिय कार्यालयातील स्थानिक मानव संसाधन विभाग प्रमुख यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना सदरची माहिती पाहता येईल व तेथील कल्याण अधिकारी देखील आवश्यक सहकार्य करतील. महानिर्मितीच्या विद्युत केंद्रे आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील कार्यरत कर्मचारी यांनी उपरोक्त माहितीच्या आधारे त्यांचे संयुक्त पर्यायी अर्ज विद्युत केंद्रात/क्षेत्रीय कार्यालयांमधील संबंधित मानव संसाधन विभाग प्रमुखाकडे २०.०२.२०२३ पर्यंत न चुकता जमा करावेत.त्याचप्रमाणे सेवानिवृत्त/निवृत्त/ राजीनामा/स्वेच्छा सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व निवृत्ती वेतनाकरिता पात्र कर्मचारी त्यांचा संयुक्त पर्यायी अर्ज स्वत: किंवा स्पीड पोस्ट/कुरिअरद्वारे संबंधित विद्युत केंद्रात/क्षेत्रीय कार्यालयामध्ये २०.०२.२०२३ पर्यंत न चुकता जमा करावेत. (जिथे त्यांची शेवटची नियुक्ती होती.)

०१.०९.२०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकरीता निवृत्ती वेतनाबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून संयुक्त पर्यायी अर्ज भरण्याबाबत तरतूद नसल्याने, पूर्व तयारी म्हणून संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून ते कार्यरत असलेल्या कार्यालयांनी संयुक्त पर्यायी अर्ज भरून घ्यावा. तथापि, याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाद्वारे वेळोवेळी प्राप्त झालेल्या/होणाऱ्या सूचना/ मार्गदर्शनानुसार पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. १.०९.२०१४ पूर्वी रूजू झालेले व सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी तसेच ०१.०९.२०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पर्यायी अर्ज (Joint Option Form ) २० फेब्रुवारी, २०२३ पर्यंत संबंधित विद्युत केंद्र/क्षेत्रीय कार्यालयाच्या मानव संसाधन विभाग प्रमुखाकडे सादर करावा लागेल. त्यानंतर सर्व विद्युत केंद्र कार्यालय / क्षेत्रीय कार्यालयांतील मानव संसाधन विभागप्रमुखांनी सर्व माहिती सांघिक कार्यालयांतील मानव संसाधन देयके या विभागप्रमुखाकडे २२.०२.२०२३ पर्यंत हस्तांतरित करावेत. संयुक्त पर्याय अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पर्यायात बदल करता येणार नाही/केला जाणार नाही.मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ०४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निकालाच्या संदर्भात कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ (EPS- ९५) अंतर्गत प्रत्यक्ष वेतनावर निवृत्ती वेतन वापर करण्यासाठी संयुक्त पर्याय अर्ज सादर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अद्याप प्रलंबित आहेत. सदर परिपत्रक केवळ वेळेच्या मर्यादेचे पालन करण्यासाठी व झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या अधीन आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com