– अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती :- शिक्षण हे विद्यार्थांचे ज्ञान, कौशल्य, मूल्य तसेच संस्कार निर्माण करणारी विकासात्मक प्रक्रिया आहे. महाविद्यालयीन जीवनात सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच विद्याथ्र्यांमध्ये मानवीय भावना, प्रेम, करुणा, विवेकी विचार निर्माण व्हावे याकरिता मूल्य शिक्षणाची बीजे रुजविणे गरजेचे आहे. या मूल्य शिक्षणाबरोबरच विद्यार्थांसाठी रोजगार हा समाजातील ज्वलंत विषय निर्माण झाला आहे. हजारो शिक्षित युवक युवती बेरोजगारी ह्या समस्या मुळे चिंतातुर असल्याचे विदारक चित्र बघायला मिळते. याच विदारक चित्राची वास्तविकता लक्षात घेता विद्यार्थांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत असताना कौशल्ययुक्त व रोजगाराभिमुख शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हीच यथार्थता लक्षात घेत विद्यार्थांना कौशल्य शिक्षण मिळावे, त्यांचा रोजगाराभिमुख विकास व्हावा, ही विद्यार्थी केंद्रित संकल्पना राबविण्याची महत्वाची भूमिका संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एम.ए. आजीवन अध्ययन व विस्तार हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पार पाडत आहे.
सदर अभ्यासक्रमाची सत्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतो. सदर अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून यामधे चार सेमीस्टर चा समावेश आहे. समाजातील पदवीधर युवक – युवती, गृहिणी महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लघु व्यावसायिक या अभ्यासक्रमाध्ये प्रवेशित होऊ शकतात. प्रवेश घेणाऱ्या विद्याथ्र्यांंना वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. सदर अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० नुसार निर्देशित केलेल्या विद्यार्थी केंद्रित संकल्पनेला महत्व देऊन चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम (सी.बी.सी.एस.) मध्ये नमूद कौशल्यपूर्ण व मूल्य शिक्षणाचे धडे दिल्या जातात. एवढेच नव्हे तर विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावे, या करीता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते. यामधे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद, कार्यशाळा, कौशल्य विकास कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येते.
अभ्यासक्रम हा वर्गात शिकविण्यापूताच मर्यादित नाही, तर विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक क्षेत्रातील कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, सामाजिक न्याय ऑफिस, महिला व बालकांवर कार्य करण्या-या शासकीय व निमशासकीय संस्था, वृद्धाश्रम, तसेच ज्येष्ठ नागरिक कक्ष या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थांना तिथल्या कार्यप्रणाली विषयीची माहिती प्राप्त करता येते.यामधून विद्यार्थांना रोजगार प्राप्ती बरोबरच समाजातील महत्वपूर्ण घटकांच्या वास्तविक परिस्थितीबद्दल अवलोकन होते. या बरोबरच हा अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थांना शासकीय तसेच निमशासकीय स्वयंसेवी संस्थेमधे प्रकल्प समन्वयक, आदिवासी विकास विभाग, पंचायत समिती ,जिल्हा परिषद, महनगपलिका, इतर शासकीय पदाकरीता कार्य करता येते. त्याचप्रमाणे पदवी प्राप्त विद्यार्थी हा स्वतःचे लाईफलाँग लर्निंग सेंटर सुद्धा सुरू करू शकते. अशाप्रकारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध आहेत. अशा नाविन्यपूर्ण व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये पदवीधर विद्यार्थांना प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अधिक माहिती करिता डॉ. प्रशांत भगत (विषय समन्वयक) 9588453107, प्रा. सुरेश पवार -9356524779 व प्रा. वैभव जिसकार – 9130451949 यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.