गडचिरोली – कोणतीही गरज नसताना राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पसह पतानील व ताडोब्यातील सुदृढ हत्ती गुजरातला पाठवून हे पर्यटनस्थळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा डाव हाणून पाडा असे आवाहन युवक काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हत्तींच्या स्थलांतरणावरून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून राज्यातील वनवैभव व एकमेव पर्यटनस्थळ वाचविण्यासाठी आता सर्वच जण सरसावल्याचे चित्र आहे.
नक्षल्यांचे माहेरघर म्हणून कुप्रसिद्ध असलेला कमलापूर परिसर दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हत्ती कॅम्पमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले. राज्यातील कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देतात. त्यामुळें नक्षली कारवाया देखील कमी झाल्या. येथील नागरिकांना नवा रोजगार मिळाला. असे असताना हे हत्ती कॅम्प पर्यटनाच्या दृष्टीने वाढविण्याचे सोडून केंद्र सरकार हस्तक्षेप करून येथील हत्ती अंबानींच्या प्राणी संग्रहालयाची शोभा वाढविण्यासाठी गुजरातला पाठवीत आहे. हा डाव येथील जनता यशवी होऊ देणार नाही असे युवक काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. प्रणितकुमार जांभुळे यांनी प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे. वनविभागाने नुकतेच काढलेल्या आदेशात येथील हत्ती अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे, मात्र हे खोटे असून उलट नैसर्गिक अधिवासात त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे येथील पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. साधारण पन्नास साठ वर्षांपूर्वी वनविभागाची कामे करण्याकरिता काही हत्ती या भागात आणण्यात आले होते. मात्र, आज जे हत्ती आहेत ते इथेच जन्मले. कमलापूर हत्ती कॅम्प, पातानिल आणि ताडोबा परिसराची नसर्गिक आणि भौगोलिक रचना बघता हत्तींसाठी हा भाग स्वर्ग आहे. मग या मोकळ्या वातावरणातून त्यांना हजार किमी लांब बंदिस्त वातावरणात नेण्याचे औचित्य काय हा प्रश्न देखील जांभुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री यांना पत्र देखील पाठवले आहे. विशेष म्हणजे हत्ती स्थलांतराचा आदेश निघून पाच दिवस झाल्यावरही क्षेत्रातील आमदार,नेते गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
पालकमंत्र्यांनी निधी द्यावा
गडचिरोलीचे पालकमंत्री देखील हजार किलोमीटर लांब राहतात त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीची जाण असेलच असे नाही. त्यांनी विशेषकरून यात लक्ष द्यावे व हत्ती व कॅम्पच्या संवर्धनासाठी जो काही निधी लागत असेल तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही जांभुळे यांनी केली आहे.
जनाआंदोलनं उभे राहणार
कमलापुर हत्ती कॅम्प हे राज्यासह जिल्ह्याचे वैभव आहे. येथील नागरिकांचे या परिसराशी भावनिक नाते जुळले आहे. त्यामुळे हत्ती स्थलांतर होणार या बातमीने अनेकामध्ये असंतोषाचे वातावरण बघायला मिळत आहे. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास समाज माध्यमावर सुरू असलेला विरोध रस्त्यावर येऊन या भागात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.