संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शेकडो हेकटरवरील कापणी केलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या
कामठी :- विदर्भात हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार 27 ते 29 नोव्हेंबर पर्यंत कामठी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.परिणामी 27 नोव्हेंबरपासून कामठी तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत पावसाचे ढग तयार झाले होते तर 28 नोव्हेंबर ला कामठी तालुक्यात पहाटेपासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असता खरीप हंगामातील कापणीसाठी आलेले धान पीक अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.तर शेतात कापणी केलेल्या धानाच्या कडपा बांध्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यात तरंगत आहेत.तर काही भिजल्या आहेत.बहुतांश ठिकाणी शेतात साठवणूक करून ठेवलेल्या धानाचे पुंजने सुद्धा ओलेचिंब झाले आहेत.परिणामी पाण्यात भिजल्या असलेल्या कडपाच्या धानाच्या लोंब्याला व पुंजण्यातील धानाला अंकुर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कामठी तालुक्यातील शेकडो च्या वरील हेक्टर वरील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका पडल्याने पुन्हा एकदा शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे.यासाठी आज आमदार टेकचंद सावरकर यांनी खुद्द तहसीलदार अक्षय पोयाम यांना शेतावर बोलावून आजनी,गादा,उनगाव आदी गावातील शेतात भेट देऊन झालेल्या धानपिक शेताची पाहणी करून तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष निशा सावरकर, माजी जी प सदस्य अनिल निधान,कामठी पंचायत समितीचे माजी सभापती उमेश रडके, कुणाल कडू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ऐन शेतकऱ्याच्या हातात आलेल्या धानाचे पूर्णता नुकसान झाले असून सदर धान बाजारपेठेत विक्रीस अथवा खाण्यायोग्य उरला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातच धान पीक कापणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यानी शेतात रब्बी हंगामात गहू आदी पिकाची पेरणी केली आहे त्यातही झालेल्या अवकाळी पावसाने शेतात साचलेल्या पावसामुळे सदर रब्बी हंगामातील गहू आदी पिके मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे चिंतेच्या अश्रूने पाणावले आहेत तेव्हा तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आदेशीत केले.