– प्रभात फेरी काढत दिला मतदान करण्याचा संदेश
नागपूर :- नागपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडत मतदान करावे याकरिता नागपूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला साथ देत ज्येष्ठ नागरिक मंडळांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी (ता: 7) मनपाच्या हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या दत्तात्रय नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाने परिसरात मतदान जनजागृती प्रभात फेरी काढत मतदारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले.
नागपूर शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका द्वारा विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रीय सहभाग मनपाला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रासाठी एक तास देत, मतदारांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर यांनी केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांनी मंडळाच्या सदस्यांद्वारे मतदान जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. यात दत्तात्रय नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाने परिसरात मतदान जागृती प्रभात फेरी काढत मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन मतदारांना केले आहे. यावेळी हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, मंडळाचे अध्यक्ष नामदेव फटिंग,भास्कर राघोर्ते, मनोहर धाबेकर ,पद्माकर आगरकर, श्रीराम दुरगकर, हरीश देशमुख,भीमराव पाटील, सुरेश धामणकर, वाल्मीक आंबेकर, महादेव बोराडे,मालती मामीडवार,माया सुनवानी,विद्या सातपैसे,विना विंचुरकर, चंदा बांगरे,इंदू बाविस्कर, कुंदा गंधारे,अरुणा उरकुडे, मंदा फटिंग ,वेणू घोडखंदे, वंदना तांदूळकर यांच्यासह इतर ज्येष्ठ नागरिक व मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मतदान जनजागृती प्रभात फेरीचा पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान येथून प्रारंभ झाला. समोर मतदानाला प्रेरणा देणाऱ्या घोषणांचा फलक लावलेला रथ होता. त्यामागे घोषणाचे फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक चालत होते. ही पदयात्रा रघुजी नगर सोमवारी पेठ आणि चक्रधर नगर मार्गावरून मार्गक्रमण करीत पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान येथे परतली व येथेच फेरीचे समापन झाले.