– केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे राशीन येथील सभेत आवाहन
कर्जत :- विधानसभा निवडणूक ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी चे युद्ध असून भ्रष्टाचारी विरोधकांना धूळ चारायची आहे. महाराष्ट्राचा मान ,सन्मान आणि अभिमान राखण्यासाठी एकजुटीने महाविनाश आघाडीला धडा शिकवा असे आवाहन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी केले. कर्जत- जामखेड मतदार संघातील भारतीय जनता पार्टी- महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी राशीन येथे झालेल्या सभेत ज्योतिरादित्य शिंदे बोलत होते. या सभेला व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, मधुकर राळेभात,अंबादास पिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, या निवडणुकीत देश आणि राज्याचा विनाश करणा-या आघाडीला पराभूत करायचे आहे त्यासाठी जागृत व्हा आणि मोठ्य़ा संख्येने महायुतीचे उमेदवार भाजपाचे राम शिंदे यांना विधानसभेमध्ये पाठवा. जातीपातीमध्ये विभाजन करणारे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे,आणि आरक्षण संपवण्याची भाषा करणारे असे महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड,हरियाणा आणि आता त्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वसमावेशक विकासासाठी भाजपा प्रणित महायुती सरकार सत्तेत आणायचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांचा खरा भ्रष्टाचारी चेहरा उघड झाला आहे. विकास स्थगित करण्याचे काम करणारी महाविनाश आघाडी एकीकडे तर दुसरीकडे वेगाने विकास करणारे डबल इंजिन सरकार आहे . एकीकडे राज्याची तिजोरी रिकामी करणारी महाविनाश आघाडी तर दुसरीकडे सर्वांसाठी तिजोरी खुली करणारी महायुती आहे अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
भाजपा आणि राम शिंदे यांच्या प्रयत्नाने या भागाचा वेगाने विकास झाला असून कोंभळी येथे एमआयडीसी,13 कोटींची जलयोजना मंजूर झाली आहे.तसेच जगदंबा देवस्थानासाठी निवासी व्यवस्थेची सुविधा पूर्णत्वास जात आहे, असा विकास कामांचा लेखाजोखा शिंदे यांनी सर्वांसमोर ठेवला.केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती चे सरकार हे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारे आहे.समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा विकास आणि प्रगती साधणा-या महायुती सरकारला निवडून द्याल तर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये ,किसान सन्मान निधी योजनेचे 12 हजार वरून 15 हजार रुपये इतकी वाढ होईल आणि त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होईल असेही ते म्हणाले.