– विदर्भातील 2014 व 2019चे निकाल ; निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण माहितीचा समावेश
नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024च्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने विदर्भातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या माहितीवर आधारित तयार करण्यात आलेल्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते झाले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक केतन लाड, माध्यम समन्वयक अधिकारी अनिल गडेकर,विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार,सहायक संचालक पल्लवी धारव,शासकीय लेखन सामुग्री भंडारचे सहायक संचालक पुष्पराज वाघमारे यावेळी उपस्थित होते.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत. ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच महत्वाची असून माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधीत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना पूर्वपीठिका सुलभ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही पूर्वपीठिका नागपूर व अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
माध्यम प्रतिनिधी व विधानसभा निवडणुकीतील विविध अधिकाऱ्यांना ही पुस्तिका संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल. ही पुस्तिका नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे.
पूर्वपीठिका 2024 मध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणूक कार्यक्रम, विधानसभा मतदार संघनिहाय मतदार व मतदान केंद्राबाबत माहिती, विदर्भात झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक वर्ष 2014 आणि 2019 चे निकाल तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक वर्ष 2014, 2019 आणि 2024चे निकाल व मतदारांची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी ,इतर अधिकारी, तसेच विदर्भातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आदींसह निवडणूक आचारसंहिता, मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचार संहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, पेड न्युज, सोशल मिडिया, निवडणूक विषयक नियमांतील ठळक बाबी आदींचा समावेश आहे.