नागपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्हयातील मतदानाचे प्रमाण वाढून मिशन डिस्टींक्शन यशस्वी व्हावे, यासाठी 15 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता रन फॉर डिस्टिंक्शन या मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे यासंदर्भातील तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी सौम्या शर्मा, परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चार प्रकारात या दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. यात 1, 3,5 आणि 10 किलोमीटरची दौड असणार आहे. कस्तुरचंद पार्क येथून ही दौड सुरू होणार असून प्रत्येक दौडच्या समाप्तीचे वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या दौडमधील विजेत्यांना एक लाखांपर्यंतची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह मतदारांनी या दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
सोसायट्यांमध्ये होणार सोसायटी कनेक्ट प्रोग्राम
स्टुडंट कनेक्ट या मतदान जागृतीच्या कार्यक्रमानंतर आता सोसायटी कनेक्ट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये मतदान जागृती करण्यात येणार आहे. यासाठी विविध मतदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचाही आढावा आज जिल्हा निवडणूक अधिकारी इटनकर यांनी घेतला.
लोगोचे अनावरण
मतदार जनजागृती दौडच्या लोगोचे आज महानगरपालिका मुख्यालयात अनावरण करण्यात आले. महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपीन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, परीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी मैराथन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण केले. यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, महेश धामेचा , लीना उपाध्ये, मिलिंद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकर, पल्लवी धात्रक व पीयुष आंबुलकर आदी उपस्थित होते.