नागपूर :- राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, बहुतांशी गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात दाखल होत आहेत. मंडळांकडून मंडपासह लगतच्या परिसरात विद्युत रोषणाई केली जातआहे. मात्र, सर्व गणेशोत्सव मंडळांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षेवर भर द्यावा. जिथे गरज आहे; तिथे अर्थिग द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात विद्युत संचमांडणी करताना विद्युतभार वाढ, घट, फेरबदल विद्युत पुरवठादार कंपन्यांच्या लेखी परवानगीशिवाय करू नये. तात्पुरते वीज मीटर लावण्यासाठी फायबर सिमेंट बोर्डचा वापर करावा. संचमांडणीची देखभाल-दुरुस्ती मान्यताप्राप्त विद्युत कंत्राटदाराकडून करावी. या कालावधीसाठी त्याची नेमणूक करावी. संचमांडणीत बसविण्यात येणारे रेसिडयुअल करंट डिव्हाइस बसावेत. ते कायमस्वरूपात राहतील याची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत ते बायपास करू नयेत. सर्व उपकरणांचे, विद्युत यंत्रांची अर्थिग योग्य आहे का, ते तपासावे. वेळोवेळी चाचणी घ्याव्यात. मल्टी प्लगचा उपयोग करू नये. एका प्लगवर एकच मशीन जोडावी, अशा सूचना महावितरनतर्फ़े करण्यात आल्या आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष शिबिर
गणेशोत्सावासाठी सार्वजनिक मंडळांना महावितरणतर्फ़े तात्पुर्ती वीज जोडणी दिल्या जात आहेत, यासाठी शहरात महावितरणच्य विविध कार्यालयांत विशेष शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येत आहेत. या शिबिरात तात्पुरती वीज जोडणि घेऊ इच्छीणा-या सार्वजनिक मंडळांना सर्व मदत केल्या जात आहे.
महावितरणकडून घरगुती दराने वीज
गणेशोत्सव मंडळांना महावितरणकडून जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
मंडळांनी ही घ्यावी खबरदारी…
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब – उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, मंडपातील वीज संच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, मंडपातील वीज संच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून घ्यावी, गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, आपत्कालीन स्थिती करिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत किंवा महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत…
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.