मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

– भर पावसात हजारोंच्या उपस्थितीसह उदंड प्रतिसाद

–  बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह

यवतमाळ :- महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.

वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला भर पावसात हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. मान्यवरांनीही गुलाब पुष्प उधळून लाडक्या बहीणींचे स्वागत केले. काही भगिणींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त केला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना त्यात होती. त्यातून आलेला आनंद त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. यावेळी महिला भगिनी हात उंचावून मोबाईल टार्च लावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

रक्षाबंधनचा सण गोड झाला – निशा राठोड

दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील निशा रोहिदास राठोड यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ‘ रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते, राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात…माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला….!” आणि माझी चिंता मिटली….’ अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते. निशा राठोड यांच्यासारख्याच यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिला लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भगिनींच्या या बोलक्या प्रतिक्रिया….

भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – सुनीता रामटेके

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली आर्णी तालुक्यातील लोणी येथील सुनीता रामटेके यांनी. अशीच प्रतिक्रीया लोणी येथील रहिवासी मिना शिंदे यांनी देऊन मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानले.

मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी – श्वेता चव्हाण

शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमचे आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुलांचे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी श्वेता विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – संगीता चव्हाण

मी शेत मजुरीचे काम करते. घरात नेहमी पैश्याची चणचण भासत होती. आता माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. या पैश्यातून मी माझ्या चारही मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदी करणार आहे. योजनेतून पैसे मिळाल्या निमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची खूप खूप आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी भावना व्यक्त केली दिग्रस तालुक्यातील वडगाव तांड्याच्या संगीता भाऊराव चव्हाण यांनी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आगमन व स्वागत

Sun Aug 25 , 2024
छत्रपती संभाजीनगर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी ११.१५ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंडे, तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस आयुक्त प्रविण पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!