मुंबईः निवडणूक आयोग स्वायत्त असल्यासारखं काम करत नाही. शिंदे गटाने जे म्हटलं, तसाच निर्णय घेतला गेला. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेवर आम्हाला विश्वास नाही, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. शिवसेना पक्ष (Shivsena Party) आणि पक्ष चिन्हाबाबत अत्यंत महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरु असतानाच ठाकरे गटाच्या नेत्याने अशा प्रकारे अविश्वास दर्शवल्याने ही टीका गांभीर्याने घेतली जात आहे .
भास्कर जाधव यांनी आज पत्रकारांशी बोलाताना ही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवसेनेतील वादात निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता कितपत पणाला लावायची?
अंधेरी पूर्व मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह, पक्षाचं हे नाव गोठवायला सांगितलं. निवडणूक आयोगानं ते ऐकलं सुद्धा.. हे निवडणूक आयोगाचं काय चाललंय? आयोगाची ही भूमिका त्यांच्या स्वायतत्तेला धरून नाही. स्वायतत्ता आहे, यावर विश्वास ठेवण्याइतपत नाही, असं माझं मत आहे… भास्कर जाधवांनी या शब्दात निवडणूक आयोगावर टीका केली.
भाजपच्या डोक्यात सत्तेची नशा…
भाजपवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, ‘ भाजपचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरु.. देशात छोटे पक्ष शिल्लक राहता कामा नये, अशी भाजपची रणनीती आहे. भाजपच्या डोक्यात सध्या सत्तेची नशा आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
शिवसेनेची सुनावणी कधी?
निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षासंबंधी महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. येत्या ३० जानेवारी रोजी आयोग पक्षासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ठाकरे तसेच शिंदे गटाला आयोगाने लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष येत्या 30 जानेवारी रोजीच्या सुनावणीकडे लागलं आहे.