नवी दिल्ली :- स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्दयांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवा राज्याचे मुख्यमंत्री, प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली व यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, अदिती तटकरे सहभागी झाल्या.
या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), कनुभाई देसाई (अर्थमंत्री, गुजरात) आणि के एन बालगोपाल (अर्थमंत्री, केरळ) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत आदिती तटकरे उपस्थित होत्या.
या बैठकीत स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेषत: जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (स्वयं-पुनर्विकास किंवा विकासकामार्फत) आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या विविध विषयांवर त्यांनी राज्याच्या वतीने मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.
या बैठकीत पर्यटन प्रकल्पासाठी जमिनीच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावरील कर आकारणीच्या मुद्द्यांवर ही चर्चा करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. मंत्र्यांच्या समूहाने (GoM) श्रीमती तटकरे यांनी मांडलेल्या मुद्दयांची दखल घेतली गेली असल्याचे तसेच यावर सकारात्मक विचार करण्याचा तसेच पुढील बैठकीत अधिक तपशिलांसह त्यावर अधिक चर्चा करण्याचे ठरविले, असे तटकरे यांनी सांगितले.