विशेष लेख : जाणून घेऊया – जी-20 आणि त्याचे कार्य

जागतिक स्तरावरील जी-20 (गृप ऑफ 20) शिखर परिषद आयोजित करण्याचा बहुमान यावर्षी भारताला मिळाला आहे. जी-20 अंतर्गत नागरी समाज संस्थांचा अर्थात ‘सिव्हील सोसायटी’ (सी-20) या गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे येत्या 21 व 22 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे. सी-20 परिषदेच्या माध्यमातून स्थानिक नागरी संस्थांना आपले कार्य-कर्तृत्व जगाच्या व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाण-घेवाणीचे केंद्र म्हणून नागपूर शहराला सादर करण्यासाठी हे महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. देश-विदेशातील पाहुण्यांच्या आदरातिथ्याची संधीही भारताचे हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला मिळाली आहे.

नागपूर शहरात होणाऱ्या या जागतिक परिषदेबाबत जनसामान्यांमध्ये विशेष कुतुहल आहे. जी-20 परिषद, या परिषदेचे कार्य व व्याप्ती, ध्येय-धोरणे तसेच नागपूर शहरात आयोजित कार्यक्रमांची माहिती, येणाऱ्या पाहुण्यांची ओळख, या सर्वांचा नागपूर आणि पर्यायाने विदर्भातील सामान्य जनतेशी असलेला संबंध, त्याचा सर्वसामान्यांना होणारा लाभ याबाबत विशेष माहिती या लेखातून जाणून घेवूया.

जी-20 काय आहे ?

जी-20 किंवा गृप ऑफ 20 हा 19 देश आणि युरोपियन युनियन या देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे. 1999मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक स्थिरता आणि अर्थव्यवस्थेतील वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने या गटाची स्थापना करण्यात आली. जी-20 सदस्य राष्ट्रांचा जागतिक जी.डी.पी. मध्ये 85 टक्के वाटा आणि जागतिक व्यापाराच्या 75 टक्के वाटा आहे. हा गट जगाच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो.

सुरवातीला जी-20 हा सदस्य राष्ट्रांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांचा एक अनौपचारिक मंच होता. 2008 साली जगाला भयानक मंदीचा सामना करावा लागल्यानंतर या संघटनेतही बदल झाले आणि तिचे रूपांतर सदस्य राष्ट्रांच्या आघाडीच्या नेत्यांच्या संघटनेत झाले. यानंतर जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या जी-20 गटाचे कोठेही मुख्यालय अथवा सचिवालय नाही. जी-20ची शिखर परिषद ही चक्राकार पद्ध्तीने निवड झालेल्या सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी त्या-त्या देशात आयोजित केली जाते.

यावर्षीच्या जी-20 परिषदेचे घोषवाक्य

1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत जी-20 संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या यजमानपदात आयोजित या परिषदेचे घोषवाक्य “वसुधैव कुटुम्बकम्” अर्थात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आहे.पृथ्वीतलावरील मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यासह संपूर्ण जीवसृष्टीचे महत्व आणि त्यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

जी-20 चे सदस्य देश

जी-20 समुहात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया गणराज्य, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रीका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युरोपीयन संघ यांचा समावेश आहे.

जी-20 चे कार्य

जी-20 हा गट व्यापार, गुंतवणूक, कर आणि आर्थिक धोरणांसह जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या विविध मुद्यांवर लक्ष केंद्रित करतो. यातून सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यात येते. जी-20 ने सुरुवातीला व्यापक आर्थिक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले. परंतु कालांतराने या गटाने व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोध या मुद्यांचा समावेश करुन कार्यविस्तार केला आहे.

वार्षिक शिखर परिषदांच्या आयोजनाव्यतिरिक्त जी-20च्या अर्थमंत्र्याच्या आणि सदस्य देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची तसेच कार्यगट आणि कार्यदलांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येते. या आयोजनांच्या माध्यमातून जी-20 देशांना विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी मंच उपलब्ध होते. या आयोजनाअंती तयार होणारी धोरणं आणि शिफारशी पुढे वार्षिक शिखर परिषदेत सादर केली जातात.

एकंदरीतच जी-20 हा आर्थिक मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी कार्य करणारा एक महत्त्वाचा मंच आहे. या गटाद्वारे घेण्यात येणारे निर्णय आणि करण्यात येणाऱ्या शिफारशी जागतिक आर्थिक धोरणांना आकार देण्यासाठी आणि विविध विषयांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ठरतात.

-गजानन जाधव

माहिती अधिकारी माहिती व जनसंपर्क, नागपूर

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com