पराभवाच्या भीतीपोटी ‘लाडकी बहीण’ योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

– महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना 25 लाख राख्या पाठविणार

मुंबई :- महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, संजय केनेकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील 25 लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार आहेत अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.

बावनकुळे म्हणाले की,‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजना ही कायमस्वरुपी योजना असून महिलांनी या 18,000 रुपयांमधील किमान 3 हजार रुपयांचा विमा जरी उतरवला तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षा कवच मिळू शकेल इतकी ताकद या योजनेत असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. लाडकी बहीण योजनेबद्दल अपप्रचार करत उद्धव ठाकरे यांनी महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. करोडपतींच्या घरात जन्माला आलेल्यांना या योजनेचे मोल कळणारच नाही. महिला वर्गासाठी उपयुक्त योजनेची खिल्ली उडवून उद्धव ठाकरे यांनी आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

महायुती सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आत्मसन्मान देण्यासाठी प्रति महिना 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये खात्यात जमा करणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केल्याबद्दल बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले की,काँग्रेस आणि सहका-यांचे सरकार असलेल्या कर्नाटक,हिमाचल प्रदेश मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गृहलक्ष्मी योजनेचे आश्वासन देऊन मते घेतली आणि सत्ता आल्यानंतर योजना बंद केली. जनतेशी अशी लबाडी करणा-यांना लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याचा अधिकारच नाही. लबाड पार्टीसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंना या योजनेत पण लबाडीच दिसते यात काही नवल नाही.

मध्यप्रदेश सरकारचे उदाहरण देत, भाजपा आणि सहका-यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतपेढी वर लक्ष ठेवून योजना घोषित न करता कायमस्वरुपी योजना राबवल्या जातात असे बावनकुळे यांनी नमूद केले . कर्नाटक आणि मध्य प्रदेश या दोन राज्य सरकारांमधील फरक मांडत येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात जनता भरभरून मते देईल असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलून दाखवला. 42 लाख शेतकऱयांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा तर्फे बावनकुळे यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्तांचा आजीबाईंना दिलासा

Mon Aug 12 , 2024
– मुलांनी घरच हिसकावून घेतले आता कुठे जाणार ? आजीबाईंचा करुण सवाल – विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- मुलाने गाफिल ठेवत अंगठ्याचे ठसे घेवून घर व दुकान स्वत:च्या नावावर करुन घेतले. आता डोक्यावरचे छप्पर गेले, रहायला जागा नाही, कुठे आसरा घेणार ! अशा करुण भावना जरीपटका भागातील भोजवंता शेंडे (८०) यांनी विभागीय आयुक्तांपुढे मांडल्या. या प्रकरणातील पोलीस चौकशीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com