– नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपीची कारवाई
– वेगवेगळ्या घटनेतील 15 आरोपी जाळ्यात
– नक्षलग्रस्त भागात घेतला आरोपींचा शोध
नागपूर :- ओडिशा ते नागपूरपर्यंत गांजाची तस्करी करणार्या आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी पकडले. तीन वेगवेगळ्या कारवायात 140 किलो गांजा हस्तगस्त केला. जप्त गांजाची किंमत 22 लाख रुपये आहे. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागात शोध मोहीम राबवून सर्व आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी केली. आरोपी रास छत्रिया (44) रा. ओडिशा याची शनिवार 6 जुलैला पोलिस कोठडी संपली.
लोहमार्ग पोलिस नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना काही इसम संशयास्पद आढळले. त्यांच्या हालचालीवरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यांच्या ट्रॉली बॅग व सुटकेसमध्ये सेलोटेपने बांधलेले पॅकेट मिळाले. या पॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला.
ओडिशा राज्यातील केसिंगा व तितलागड येथून खरेदी केलेला गांजा रेल्वेने नागपुरात आणला. नागपुरातून तामिलनाडू तसेच समता एक्सप्रेसने झाशी, ग्वाल्हेरला पोहोचविणार होते. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक व सहावर गाडीच्या प्रतीक्षेत असताना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांची विविध पथके ओडिशाच्या नक्षलग्रस्त भाग असलेल्या बालंगीरला रवाना झाली. या परिसरात फिरकणेही कठीण आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस अधीक्षकांची मदत घेण्यात आली. अधीक्षकांनी बंदूकधारी जवानांची मदत आणि वाहन दिले. निर्जन व जंगली भागात शोध मोहीम राबवित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सर्व आरोपींना नागपुरात आणल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या नेतृत्वात एपीआय कविकांत चौधरी, निलम डोंगरे, जावेद शेख, संजय पटले, प्रवीण खवसे, अमोल हिंगणे, पुष्पराज मिश्रा, अमित त्रिवेदी, किरण काळबांडे, मेश्राम आणि शेंडे यांनी केली.
आरोपींची कारागृहात रवानगी
राकेश जाटव (26), अयान खान (20), दिनेश विश्वकर्मा (24) तिघेही रा. मध्यप्रदेश, विजय श्रीवास (20), पवन राजपूत (19) दोन्ही रा. उत्तर प्रदेश, महुआ, पुष्पेदर राजपूत (19) रा. छतरपूर, योगेश मेहरा (29), राजेश यादव (28), शिवा दुबे (19) रा. उत्तरप्रदेश, मुकेश यादव (21) रा. मध्यप्रदेश, निलेश किर (27) रा. मध्यप्रदेश, अखिल यादव (24), अश्वीन यादव (25) दोन्ही रा. इंदोर आणि सुशिल अग्रवाल (53) रा. ओडिशा अशी अटकेतीला आरोपींची नावे आहेत.