यवतमाळ :- जनावरांची खरेदी विक्री करतांना शेतकऱ्यांची फसवणुक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे.
ईअर टॅगिंग व नोंदणीमुळे विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री वाढणे, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ या अनुषंगाने पुरावाजन्य निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी- विक्री टॅगिंग करून झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथ रोग प्रादूर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
रेगुलेशन ऑफ लाईव्हस्टॉक मार्केट नियम 2017 मधील सेक्शन 22 (फ) व सेक्शन 26 अन्वये पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी करण्यात आलेल्या पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अद्यावत करण्याबाबत निर्देशित केलेले आहे. तसेच बाजारामध्ये पशुधनाची ने-आण करताना कोणत्याही प्रकारची क्रुरता होणार नाही याची देखील दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
प्राण्यांमधील क्रुरतेस प्रतिबंध अधिनियम 1962 (जनावरांच्या बाजारांची नियमावली-2017) व शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी याबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. बाजारात ईअर टॅगिंग नसलेले पशुधन असल्यास त्यांची तिथेच ईअर टॅगिंग करण्याच्यादृष्टीने पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यांमधील कार्यरत फिरते पशुचिकित्सा पथक यांची सेवा प्रत्येक जनावराच्या बाजारांमध्ये उपलब्ध करावी. त्याद्वारे बाजारातील पशुधनास आवश्यक पशुवैद्यकीय सेवा तसेच विषयांकित बाबींच्या अनुषंगाने शेतकरी, पशुपालक, जनावरांचे व्यापारी यांना प्रबोधन करावे, सदर बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी तसेच यशस्वीतेसाठी सर्वतोपरी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केल्या आहे.