– मनपातर्फे पथनाट्य अन् फ्लॅश मॉबद्वारे मतदानाचा जागर
नागपूर :- उज्वल भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ‘होय..मी मतदान करणार” म्हणत नागपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित कार्यक्रमात बुधवारी (ता:०३) सकाळी शेकडोंच्या संख्येत नागरिकांनी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेतली. तसेच “तुम्ही मतदान करणार ना..” असे फलक हाती घेऊन पथनाट्य, फ्लॅश मॉब आणि रँलीद्वारे मतदानाचा जागर करण्यात आला.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे बुधवारी (ता.०३) सकाळी सीए रोड स्थित भारत माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मतदार जनजागृती करीता फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर शाळा निरीक्षक जयवंत पितळे, प्रशांत टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता संजय माटे, रोशन अहीरे यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी व मनपा शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर शहरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे व ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांद्वारे फ्लॅश मॉब व पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मनपाच्या डॉ. राम मनोहर लोहिया शाळेच्या व संजय नगर हिंदी माध्यामिक शाळा, मिनी माता नगर विद्यार्थांमार्फत परिसरात मतदान जनजागृती रँली काढण्यात आली. मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत अशा विविध गीतांमधून नागरिकांचे लक्ष वेधले व पुढे ‘मतदान कर…’ अशी साद देखील घातली. तसेच पथनाट्याद्वारे मतदान का आवश्यक आहे, हे देखील पटवून दिले.
मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेतर्फे पथनाट्याचे लेखन नंदिनी मेनजोगे यांनी केले तर संकल्पना आदित्य खोब्रागडे यांची होती. संस्थेचे आकाश निखाडे, सर्वेश हरडे, सुजाता कावरे, संजना मानवटकर, कुणाल पवार, आदर्श दुधनकर, नयन हावरे, प्रशांत बेलसरे, पलाश हेडाऊ, रोशन वांढरे, जान्हवी वांढरे, वृषाली भानारे, साक्षी सारडा, निखिल दुधनकर, आचल पौनीकर, विनीत चांडक, गौरी रुद्राकर, चेतन दुधनकर, मोहिनी जंगले, समीक्षा जंगले या स्वयंसेवकांनी पथनाट्य व फ्लॅश मॉब मध्ये सहभाग नोंदविला. नागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.