नागपूर :- नागपूर विभागातील सर्व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजकांनी हॉटेल रिसोर्ट,होम स्टे, कृषी पर्यटन केंद्र साहसी पर्यटन केंद्र उपहारगृह, टुर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नविन व्यवसाय इच्छुक महिला उद्योजकांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.
पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पर्यटन विभागाने ‘आई’ पर्यटन धोरणाचा अवलंब केला आहे. या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसुत्री जाहीर केली असून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करुन पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यातून या योजनेसाठी नागपूर येथील महिला उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र, गतिशिलता महत्वाकांक्षा आणि निर्णयक्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणे, तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे हे आई या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट असणार आहे.