नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संकुल मैदानावर अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे , कुलसचिव डॉ. राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकवर चार बाय शंभर मीटर मिक्स रिले शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या रिलेचा शुभारंभ नव्या सिंथेटिक ट्रॅकवर उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक
विद्यापीठाच्या हा सिंथेटिक ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून ट्रॅकवर ४०० मीटरच्या एकूण आठ लेन आहेत. ट्रॅक्टवर पूर्व दिशेला गोळा फेक आणि भालाफेक तर पश्चिम दिशेला हातोडा फेक स्पर्धेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण दिशेला दोन ठिकाणी लांब उडी व तिहेरी उडीसाठी जम्पिंग पीटची सुविधा असणार आहे. ट्रॅकवर स्टिपल चेस प्रकारासाठी विशेष सुविधा आहे. ट्रॅक खराब होण्यापासून रोखण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम व्यवस्था आहे. स्पर्धेपूर्वी सरावासाठी मैदानाच्या पूर्व व पश्चिम दिशेला विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मैदानावर दिवस- रात्रीचे सामने खेळता येणार आहे.
मध्यभागी फुटबॉल मैदान
ट्रॅकच्या मध्यभागी फुटबॉल मैदान कायम असून त्यावर जाण्यासह आणि तेथून बाहेर निघण्यासाठी विशेष हायड्रोलिक पूल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सिंथेटिक ट्रॅक खराब होणार नाही. मैदानात नैसर्गिक फुटबॉल फिल्ड असून ऑटोमॅटिक स्प्रिंकलर प्रणाली लावण्यात आली आहे. वातावरण आधारित ही स्प्रिंकलर प्रणाली आहे. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून दोन लाख लिटर क्षमतेची टाकी तसेच संपूर्ण परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहेत. ट्रॅकच्या सभोवताली झाडे आणि हिरवळ राहणार आहे. फिनिश पॉईंटवर माध्यम प्रतिनिधी करिता विशेष सुविधा राहणार आहेत. स्पर्धेच्या वेळी फोटोफिनिश करिता इलेक्ट्रिकल पीट राहणार आहे. सिंथेटिक ट्रॅक आणि ॲथलेटच्या सुरक्षेकरिता ४५०० चौरस मीटर इंटरलॉक राहणार आहे.