कुटुंबातील “ती” च्या कडून मुलांना मिळते आत्मविश्वासाचे बाळकडू, मनपाच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकच क्षेत्रात महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर महिलांनी हवे ते यशोशिखर गाठले आहे. महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची उणीव नाही, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर खचून न जाण्याचा आत्मविश्वास मुलांना कुटुंबातील “ती”च्या कडून अर्थात आजी, आई, बहिण यांच्याकडून मिळतो, त्यांना बघून समाजात वावरताना हवे असणारे आत्मविश्वासाचे बाळकडू मिळत असते, असे एकमत मनपाच्या महिला दिन कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्यावतीने सोमवारी (ता. ११) मनपा मुख्यालयातील हिरवळीवर महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्नेहल चौधरी कदम, प्रमुख वक्ता डॉ. रेखा बाराहाते, गिर्यारोहक बिमला नेगी देऊस्कर, डॉ. रोझीणा राणा, डॉ. रम्या निसाळ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात स्नेहल चौधरी कदम यांनी महिलांना कितीही व्यस्त दिनचर्या असली तरी आपला छंद जोपासावा, आपण भीतीपोटी स्वतःच आपल्याला काही गोष्टी करण्यापासून थांबवीत असतो, असे न करता महिलांनी स्वतः पासूनच प्रेरणा घेत इतरांना देखील प्रेरित करायला हवे, असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

तर गिर्यारोहक बिमला नेगी देऊस्कर यांनी संगणकीय सादरीकरण्याच्या माध्यमातून टीमवर्क संदर्भात मार्गदर्शन करीत गिर्यारोहण करताना आलेले चित्तथरारक अनुभव सांगितले. तसेच आपल्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सांगितले. याशिवाय डॉ. रेखा बाराहाते यांनी पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद कसा वाढवावा याबद्दल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, स्त्री सुदृढ असेल तर संपूर्ण घराचे आरोग्य सुदृढ असते. घरातील सर्वांची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष द्यावे, स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढावा. तसेच बालकांचे संगोपन ही केवळ घरातील महिलांची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. पालकांनी रोज मुलांशी कुठल्याही विषयावर संवाद साधायला हवा, हितगुज करायला हवे. लहान-लहान खेळ खेळावे, दररोज एक गोष्ट सांगावी, मुलांना मारू किंवा रागावू नये, त्यांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशाने मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. यावेळी बोलताना डॉ. रम्या निसाळ यांनी लैंगिक शोषण संदर्भात मार्गदर्शन केले. तर डॉ. रोझीणा राणा यांनी महिलांनी सध्याच्या युगात आपला ठसा उमटविण्यासाठी तंत्रज्ञानाने प्रगत व्हावे. जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे, पण त्यासाठी तिने स्वत: अनेक तणावांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असायला हवे, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत डॉ. रंजना लाडे यांनी मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात समाजसेवा करणाऱ्या महिलांचा आणि विविध योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा भुसारी, नूतन मोरे यांनी केले तर आभार कल्पना फुलबांधे यांनी व्यक्त केले.

महिला बचत गटांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपाच्या समाज विकास विभागातर्फे मनपा मुख्यालयातील परिसरात महिला बचत गट आणि स्वयंसहायता गटाच्या विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. यात सोनचीरैया शहरी उपजीविका केंद्र तर्फे नववारी पातळ, पेशवाई पातळ, मस्तानी पातळ, ड्रेस कापड वर इतर शोभेच्या वस्तूचे स्टॉल लावले होते, तर मातृशक्ती महिला वस्तीस्तर संस्था तर्फे घरात वापरणारे मातीचे भांडे, राधिका स्वयंसहायता महिला बचत गटतर्फे पापड व इतर खाद्यपदार्थ, पारमिता महिला बचत गटातर्फे फराळ वस्तू, पूजा महिला बचत गटातर्फे महिलांच्या कुर्ती व साड्यांचा स्टॉल, संघटित वूमेन सेल्फ हेल्प ग्रुप तर्फे घरगुती लोणचे, सहकार्य महिला बचत गट पापड इतर वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते, याशिवाय मनपा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नागपूरच्या तर्फे विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली ज्यात राजमाता जिजाऊ अर्थसहाय योजना, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांची माहिती व नोंदणी करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

All Nagpur Silamabam Belt Gradation 2024 At Womans College Nandanvan Nagpur 

Tue Mar 12 , 2024
Nagpur :- IQRA Public School students success in Silamabam martial art belt gradation 2024 at Womans College Nandanvan Nagpur organized by ALL NAGPUR SILAMBAM ASSOCIATION Nagpur IQRA Public School Tajbag Nagpur’s players were conferred with Yellow belt in Silambam belt gradation The winners are 1 Maaz Ahemad  2 Ubed Sheikh  3 Izaan sheikh  4 Rehan Sheikh  5 Bilal Sheikh  Haseeb […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com