– आदिवासी दिनानिमित्त गुणवंतांचा गुणगौरव
नागपूर :- आदिवासी समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घेवून उद्योजक बनण्याचा ध्यास घेण्याचे आवाहन, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आदिवासी विकास विभागातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आदिवासी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून कोकड्डे बोलत होत्या.अपर आदिवासी आयुक्त रविंद्र ठाकरे, नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सहआयुक्त बबीता गिरी मंचावर उपस्थित होते.
कोकड्डे म्हणाल्या, निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींनी जंगलाचे रक्षण केले आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढयातही मोलाचे योगदान दिले आहे. समृद्ध संकृतीचा वारसा जपणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठी शासनाने विविध योजनांद्वारे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ घेवून आदिवासींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि उद्योग क्षेत्रातही आपला ठसा उमटवावा. आपल्या समाज बांधवांनाही उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.
संदीप पाटील म्हणाले, प्रगत समाजासाठी औद्योगिकरण काळाची गरज आहे. त्यांनी गडचिरोली येथे मावोवाद्यांविरूद्ध आदिवासी युवकांचा ‘सी-60’ हा दल आदिवासी संस्कृतीचे करित असलेल्या रक्षणाबाबत विस्तृत माहिती दिली. देशाच्या सैन्यदलात ‘गोंड रेजिमेंट’ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत अभ्यासासाठी पूरक ‘पीक्युआरएसटी’ हा फॉर्म्युला समजावून सांगितला.
आदिवासींनी आपल्या पुर्वापार लढावू वृत्तीतून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचे व स्वविकासासोबतच इतरांचा विकास केल्यास आदिवासी समाजाचा वेगाने विकास होईल, अशा भावना रविंद्र ठाकरे यांनी व्यक्त केल्या.आदिवासी विकास विभाग अतिदुर्गम भागातील आदिवासींपर्यंत विकासाच्या योजना पोहचविण्यासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी समाजातील नवउद्योजकांच्या गुणगौरवातून इतर आदिवासी विद्यार्थी प्रेरणा घेतील व उद्योगांकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतिहास अभ्यासक प्रविण योगी, डॉ. शुभम कुमरे, सहआयुक्त बबीता गिरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दूरदृष्य प्रणालीद्वारे अमेरिकेतून योगीता वरखडे व अभिजित पेंदाम तसेच ऑस्ट्रेलिया येथून नियती राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. आदिवासी विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली. प्रकल्प अधिकारी नितीन इसोकार यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन प्रणिती मडावी यांनी केले.
नवउद्योजकांचा सन्मान
आदिवासी समाजातील नवउद्योजक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्यां व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात सर्वश्री दीपक मडावी, प्रतिक टेकाम, शुभम मडावी, वैभव मडावी, अक्षय कुमरे, रुपाली मसराम, सुशांत धुर्वे, शुभम पेंदोर, रोशनी वाडीया, मोहन वरठी, प्रसाद कुमरे, अद्वित्य उईके, राजेश वाळके, अविनाश श्रीरामे, अंकुश मसराम, अश्विनी नलावरे, विकास कन्नाके, दीव्यानी सरनाके, संजय कुमरे, संचित शिंदे, अंकुश आत्राम, श्रीकांत चौरे अक्षय चिकराम, रवी किन्नाके, सचिन श्रीराम, पूनम उसेंडी, किरण टेकाम, प्रतिभा उईके, संजय सडमाके, नंदकिशोर वरखडे, अविनाश श्रीरामे, कैलास हगवने, शितल सराटे, महेंद्र उईके, विरेंद्र कुमरे, मयंक मसराम, पूनम पूसराम, शितल जांभुळे, सुप्रिया मेश्राम, संजय टेकाम, पंकज सयाम, निलेश वाडीवा, दर्शन रणदीवे, घनश्याम पंधरे, सर्वेक्षर कोमा, अविनाश मडावी, वंदना गावंडे, जयंती शा यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी सर्वश्री कृष्णराव परतेती, ॲड. राजेंद्र मरसकोल्हे, प्रा. मधुकर उईके, दीपक मडावी, आर.डी.आत्राम, बाबुराव गावराणे, दिनेश शेराम तसेच आदिवासी शाळाचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.