गांजा तस्करीचा प्रयत्न फसला

-30 किलो अंमलीपदार्थ  जप्त
-समता एक्सप्रेसमध्ये पहाटेची कारवाई
नागपूर –  कर्तव्यदक्ष पोलिसांनी गांजा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, आरोपी मिळू शकले नाही. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास समता एक्सप्रेसमध्ये करण्यात आली. झाडाझडती दरम्यान 30 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त करून अज्ञात तस्कराविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
विशाखापट्टनम ते दिल्ली ला जाणारी 12807 समता एक्सप्रेसने मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची सूचना लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना देण्यात आली. ही गाडी नागपूर मार्गे जाणार असून पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर थांबते. त्यामुळे काशिद यांनी एक पथक तयार केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, परमानंद वासणिक, एएसआय झुरमुरे, रमेश चौधरी, रोशन मोगरे आणि योगेश घुरडे यांचा समावेश होता. गाडी येण्यापूर्वीच पथक सज्ज होते. पहाटेच्या सुमारास फलाट क्रमांक 3 वर गाडी येताच पथकाने गाडीचा ताबा घेतला. पथकातील पोलिस सर्व डब्यांची झाडाझती घेत होते. दरम्यान इंजिन पासून दुसर्‍या नंबरच्या जनरल डब्याची झडती घेत असताना बर्थवरील रॅकमध्ये एक ट्राली बॅग, दोन कॉलेज बॅग आणि एक प्लास्टिकची पिशवी होती. या बॅगमधून उग्रवास येत होता. त्यामुळे बॅगखाली उतरवून तपासणी केली असता त्यात अंमली पदार्थाचे 18 बंडल टेप पट्टीने घट्ट बांधून होते. घटनास्थळी पंचनामा आणि वजन करण्यात आले. 30 किलो 400 ग्रॅम गांजाची बाजारभाव  किंमत 3 लाख 40 हजार 500 रूपये येवढी आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात तस्कराविरूध्द गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com