विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरु – कृषिमंत्री धनजंय मुंडे

मुंबई :- भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्याच्या उर्वरित कालावधीमध्ये पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुढील काळात पेरण्यांना वेग येईल तसेच शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये म्हणून एक रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. 24 जुलै रोजी प्राप्त माहितीनुसार 1 कोटी 4 लाख 68 हजार 349 शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले असून विमा संरक्षण क्षेत्राची व्याप्ती वाढविण्याबाबत कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत, असे कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत उत्तरात सांगितले.

मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची सूचना विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी विधानपरिषद नियम ९३ अन्वये मांडली होती. त्यावरील उत्तरादाखल मंत्री मुंडे यांनी ही माहिती दिली.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस जून ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पैरण्या केल्या जातात. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होते. यावर्षी ११ जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २५ जून पासून संपूर्ण महाराष्ट्र मान्सून पर्जन्यमानाने व्यापला आहे. राज्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान २०७.६ मिमी असून प्रत्यक्षात १११.३ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ५४ टक्के),राज्यात दि.०१ जून ते दि. २३ जुलै पर्यंत सरासरी पाऊस ४५३.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस ४४१.५ मिमी आहे (सरासरी २७.४ टक्के). मराठवाड्यात माहे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून प्रत्यक्षात ५५.५ मिमी पाऊस पडला आहे (सरासरीच्या ४१.४ टक्के),मराठवाड्यात दि.०१ जून ते दि. २३ जुलै पर्यंत सरासरी पाऊस २७२.१ मिमी असून प्रत्यक्ष पडलेला पाऊस २५१.१ मिमी आहे (सरासरी ९२.३ टक्के). राज्याचे सरासरी पेरणी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर आहे.

दि.२३.०७.२०२३ अखेर राज्यात ११४.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८०टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत १२७.१२ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली होती. मराठवाडा विभागाची सरासरी पेरणी क्षेत्र ४८.५७ लाख हेक्टर आहे. दि.२३.०७.२०२३ अखेर मराठवाड्यात ४२.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सरासरीच्या ८८टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत ४५.३३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यात माहे जुलै मध्ये दि.२३.०७.२०२३ अखेर सोयाबीन पिकाची ४३.८७ लाख हेक्टर (१०६ टक्के), कापूस पिकाची ३९.७९ लाख हेक्टर (९५ टक्के), तूर पिकाची ९.६७ लाख हेक्टर (७५ टक्के), मका पिकाची ६.६४ लाख हेक्टर (७५ टक्के), उडीद पिकाची १.६२ लाख हेक्टर (४४ टक्के), मूग पिकाची १.३९ लाख हेक्टर (३५ टक्के) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे. मराठवाड्यात माहे जुलै मध्ये दि.२३.०७.२०२३ अखेर सोयाबीन पिकाची २२.३३ लाख हेक्टर (११४ टक्के), कापूस पिकाची १२.८० लाख हेक्टर (८३ टक्के), तूर पिकाची ३.१५ लाख हेक्टर (६४ टक्के), मका पिकाची २.१४ लाख हेक्टर (७९ टक्के), उडीद पिकाची ०.७२ लाख हे. (४९ टक्के), मूग पिकाची ०.६४ लाख है. (३९ टक्के) तसेच इतर पिकांची पेरणी झाली आहे.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडत असल्याने या काळात खरीप व रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या जातात. जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमितपणास बऱ्याच वेळा तोंड द्यावे लागते. अवर्षणप्रवण क्षेत्रात पावसास बऱ्याच वेळा उशीरा सुरुवात होते. खरीप हंगामात उशीरा पेरणीसाठी पिकांचे नियोजन करणे आवश्यक असते. खरीप हंगामामध्ये कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इ. पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी पिकांच्या नियोजना बाबत शिफारशी केलेल्या आहेत. नियमित मौसमी पाऊस उशीरा सुरु झाल्यास पिकांचे नियोजन, पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. यासाठी जिल्हा स्तरावर कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे व कृषी विज्ञान केंद्रे यांच्या सल्ल्याने जिल्ह्याचा पीक आपत्कालीन पीक आराखडा तयार करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध व्यवसायांबाबत कुणालाही पाठिशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Jul 24 , 2023
मुंबई :- औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याबाबत निष्पन्न झाले नाही. तथापि, सभागृहात दिलेल्या माहितीची शहानिशा करून अवैध व्यवसाय चालवणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com