– पारशिवणी तालुक्यातील आमगाव( बाबूरवाडा) येथे जमिनीचे पट्टे वाटप
नागपूर :- जिल्ह्यात सर्वत्र सर्वांसाठी घरे योजना राबविण्याकरिता सदैव कटिबद्ध राहील व प्रसंगी गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका सुद्धा निभावण्याची तयारी असल्याचे वक्तव्य माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी व्यक्त केले.पारशिवणी तालुक्यातील गट ग्रामपंचायत आमगाव (बाबूरवाडा) येथे आयोजित पट्टे वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख रूपाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोक्कड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी मंत्री व काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, जिप सभापती राजू कुसुंबे, अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर, दुधाराम सव्वालाखे, पंचायत समिती सभापती मंगला निंबोने, माजी उपसभापती चेतन देशमुख, सर्व पंचायत समिती सदस्य, सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
गट ग्रामपंचायत आमगाव ( बाबूरवाडा) येथे आयोजित कार्यक्रमात सुनील केदार यांच्या हस्ते ८४ नागरिकांना पट्टे हस्तांतरित करण्यात आले.
आपल्या वक्तव्यात सुनील केदार म्हणाले की, स्वतःचे घर ही सर्वच नागरिकांची प्राथमिक गरज आहे. पण आजही प्रशासनिक अनास्थेमुळे अनेक नागरिक यापासून वंचित आहे. आपण मंत्रीपदावर असतांनाच पारशिवणी तालुक्यातील पट्टे वाटपाच्या संदर्भात बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले होते व त्याचा पाठपुरावा केला असता आज ८४ कुटुंबाना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे. अजूनही जिल्ह्यातील इतर गावाकरिता असाच पाठपुरावा करण्याचे वचन त्यांनी उपस्थितांना दिले. या कामाकरिता तळमळीने पाठपुरावा घेतलेले पारशिवणी पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन देशमुख यांचे सुद्धा अभिनंदन केदार यांनी केले.