– ऍड. धर्मपाल मेश्राम मानले ना. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार : समाज आंदोलकांचे केले अभिनंदन
नागपूर :- अंबाझरी तलावालगतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्यानंतर येथे सुरु असलेले काम तात्काळ बंद करून कामाला स्थगिती देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला दिले होते, त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समितीने केलेल्या शिफारसीनुसार एमटीडीसीने स्थगीतीचा दिलेला हा निर्णय आंबेडकरी समुदायाच्या भावनांचा सन्मान करणारा असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली.
डॉ. आंबेडकर भवनाच्या पतनाने दुखावलेल्या समाज भावनांचा आदर करून न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक स्तरावर भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांचे आभार यानिमित्ताने ऍड. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकातून मानले. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पतनाविरुद्ध समाज आंदोलन करणाऱ्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले.
कोणत्याही पूर्वसूचनेविना क्रीडा कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडल्याचे प्रकरण भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढे आणले होते.
14 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने बाबासाहेबांचा जाहीर सत्कार केला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1976 साली त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंबाझरी तलावालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात आले. हे भवन आंबेडकरी चळवळीला गती देणारे महत्वाचे माध्यम होते. मात्र अशात हे भवन पाडणे हा आंबेडकरी समुदायासाठी मोठा आघात असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. पुढे सातत्याने या मागणीसंदर्भात पाठपुरावा देखील ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडून घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याची बाब उजागर करून पुढे भारतीय जनता पक्षाद्वारे वारंवार समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या ‘दखल’ या पुस्तकात देखील या घटनेवर विशेष भर देण्यात आला. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले होते.