मुंबई :- मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या सर्व मतदारसंघात प्रवास करणार असल्याची माहिती भाजपा चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर, सह संयोजक कृपाशंकर सिंग, प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर येथे होणाऱ्या सभेने अभियानाला प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तावडे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून या काळात होणाऱ्या या महाजनसंपर्क अभियानात मोदी सरकारच्या विविध योजनातील लाभार्थींचे संमेलन, प्रबुद्ध संमेलन, जनसंघापासून काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघात समाजातील मान्यवर, प्रभावशाली व्यक्ती , पद्म पुरस्कार, खेल पुरस्कार व अन्य महत्वाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा सुमारे साडेपाच लाख मान्यवरांना ‘संपर्क ते समर्थन’ या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तिगत भेटून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. विचारवंतांबरोबर त्या लोकसभा मतदारसंघात प्रवास करणारे राष्ट्रीय नेते, केंद्रीय मंत्री हे गेल्या ९ वर्षातील देशाच्या प्रगतीबाबत विचारमंथन करतील. तसेच जनसंघापासून भाजपामध्ये काम करणारे वरिष्ठ कार्यकर्ते ,भाजप विचाराला समर्थन देणारे अन्य संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशीही केंद्रीय मंत्री,राष्ट्रीय नेते संवाद साधतील. अभियानाच्या शेवटच्या १० दिवसात प्रत्येक मतदारसंघात मोदी सरकारच्या ९ वर्षातील कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार आहे.
या महाजनसंपर्क अभियानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुमारे १२ सभांचे आयोजन करण्यात येईल. याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व अन्य नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या युवा, महिला, अनुसूचित जाती – जनजाती आणि शेतकरी अशा वेगवेगळ्या आघाड्यांमार्फत सभांचे आयोजन करुन त्या त्या घटकाला ९ वर्षांच्या काळात काय मिळाले याची माहिती देण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी नमूद केले. तावडे यांनी सांगितले की,२३ जून रोजी जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ‘बलिदान दिनी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या १० लाख बूथवर ऑनलाईन सभेने संबोधित करतील. दोनतृतीयांश पेक्षा अधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे नियोजन या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देशातील जनतेने याला भरभरुन प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही तावडे यांनी यावेळी केले.