नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाल्याची अंतिम माहिती,निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कार्यालयाने आज दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री सर्व जिल्ह्यांमधून नागपूर येथील स्ट्राँगरुममध्ये मतदान पेटया जमा झाल्या आहेत. २ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता पासून अजनी येथील सामुदायिक भवनमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सोमवारी ३० जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वा.पासून दुपारी ३ वा. पर्यंत तर अन्य ५ जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ वा.पासून दुपारी ४ वाजेर्पंत शांततेत मतदान पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यात ९१.५३ टक्के मतदान झाले. नागपूर जिल्ह्यामध्ये ८१.४९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८९.१५ टक्के, गोंदिया जिल्ह्यात ८७.५८ टक्के, वर्धा जिल्ह्यात ८६.८२ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात ९१ .89 टक्के मतदान झाले.
सर्व जिल्ह्यांमधून स्ट्राँगरुममध्ये मतदान पेटया जमा
मतदान पूर्ण झाल्यानंतर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून नागपूर शहरातील अजनी परिसराच्या समुदाय भवनात स्थित सुरक्षा कक्षाकडे (स्ट्राँगरुम) मतपेट्या रवाना झाल्या. नागपूरात जमा झालेल्या मतपेट्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे, जिल्हाधिकार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि उमेदवार देवेंद्र वानखडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मध्यरात्री २.५० वा. स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवून स्ट्राँगरूम बंद करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी ८ वा. पासून सुरु होणार मतमोजणी
अजनी येथील समुदाय भवनात २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वा. मतपेट्या बंद केलेली स्ट्राँगरुम उघडण्यात येईल. प्रत्यक्ष मतमोजणीस सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.विजयलक्ष्मी बिदरी मतमोजणी केंद्रावर उपस्थित मतमोजणी अधिकारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आदिंना गोपणीयतेची शपथ देतील.
मतमोजणी केंद्रावर एकूण २८ मतमोजणी टेबलवर मतमोजणी होणार आहे. स्ट्राँगरुममधून बाहेर काढण्यात आलेल्या मतपेट्यांतील मतपत्रिका मिक्सिंग ड्रममध्ये एकत्र करण्यात येतील व त्यांनतर प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरुवात होईल. यावेळी उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. समुदाय भवन येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधिंसाठी माध्यम कक्ष उभारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र प्राप्त माध्यम प्रतिनिधींनाच येथे प्रवेश असणार आहे.
मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर विजयी उमेदवार घोषित होऊन त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याहस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे.