पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी 11 अॅम्बुलन्सचे लोकार्पण

मुंबई :- निसर्गचक्रात पृथ्वीवरील सर्व सजीवांची काळजी घेतली तरच मानवी जीवन सुखी होवू शकते, यासाठी पशुपक्षी यांचा जीव वाचविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवनातील दरबार हॉल येथे समस्त महाजन संघटनेच्यावतीने मुंबई शहरातील पशु पक्ष्यांच्या उपचारासाठी 11 अॅम्बुलन्स लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रुपाला, राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आमदार गीता जैन, जैन संघटनेचे गिरीषभाई शहा यांच्यासह जैन समस्त महाजन संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी म्हणाले, खरा वैष्णव तोच आहे ज्याला दुसऱ्याचे दुःख जाण आहे. दुसऱ्यांचे दुःख निवारणासाठी त्याने जरी काही कार्य केले तरीही त्याच्या मनाला गर्वाचा आणि अहंकाराचा स्पर्श देखील होत नाही. याप्रमाणे संघटना काम करीत आहे. अॅम्बुलन्सच्या माध्यमातून वर्षभरात अंदाजे 36 हजार पशु पक्षांचे प्राण वाचू शकतात.

राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्र मुनि महाराज साहेब प्रेरित अबोल जखमी पशुपक्षी यांच्या उपचारासाठी सुरू करण्यात येत असलेल्या 11 अॅम्बुलन्सद्वारे अनेक प्राण वाचतील. पशुपक्षी यांच्या उपचारासाठी जे कोणी काम करीत आहे त्यांचे जेवढे कौतुक करावे ते कमी आहे. कारण पशूंना बोलता येत नसूनही पशुवैद्यांना प्राण्यांना होणाऱ्या वेदना कळू शकतात आणि ते उपचार करतात.

केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये या उपक्रमाचे कौतुक केले आहे. केंद्र शासनाने देशभरात 5 हजार अॅम्बुलन्स सुरू केले आहेत. या अॅम्बुलन्स चा पुढील खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार 60:40 याप्रमाणे करणार आहे. कोरोना मोफत लसीकरण करण्यात आले याचे जगात कौतुक करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षांत असे उपक्रम महत्त्वाचे असून समस्त महाजन संघटनेने पुढाकार घेतला त्याबद्दल अभिनंदन करून या संघटनेच्या माध्यमातून देशातील पशुपक्षी यांची सेवा घडत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले राज्यात निसर्ग निर्मित कास पठार या ठिकाणी हजारो प्रकारची फुलांची झाडे आहेत. वर्षातून दोन महिने विविध रंग, गंध असणारी फुले फुलतात, जगातील असंख्य पर्यटन येथे येतात. या ठिकाणच्या पशुपक्षांची काळजी समस्त महाजन संघटना घेइल असे सांगून पशुपक्षांचीही निगा राखणाऱ्या या संघटनेस शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

समस्त महाजन ट्रस्टचे व्यवस्थापक गिरीश शहा यांनी संघटनेच्या कार्याविषयी प्रास्ताविक केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेशभाई शाह यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com