द ग्रेट खलींची विशेष उपस्थिती, अंकित तिवारींच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई
नागपूर : खासदार क्रीडा महोत्सवाने नागपूर शहरातील क्रीडा विश्वाला नवी उंची दिली. आपल्या शहरातील क्रीडा विश्वाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील मैदानांच्या विकासाची संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेला राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असून नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील क्रीडांगणांच्या निर्मिती आणि विकासाची संकल्पना बोलून दाखविली व त्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्याची मागणी केली. ना. नितीन गडकरींच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
मागील १५ दिवसांपासून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा रविवारी (ता.२२) डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांच्या विशेष उपस्थितीत यशवंत स्टेडियवर समारोप झाला. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सहसंयोजक डॉ. पीयूष आंबुलकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, सर्व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरात निर्माण होणाऱ्या क्रीडांगणांचे संकल्पचित्र व डिझाईन ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेनुसारच तयार होईल व नागपूर सुधार प्रन्यास त्याची अंमलबजावणी करेल, असे जाहिर केले. धंतोली येथील यशवंत स्टेडियमचे सुद्धा पुनर्विकास प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी, यूजरचेंज राज्य सरकारकडून लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मानकापूर येथील क्रीडा संकुल अत्याधुनिक करून त्याच्या देखरेखीसंदर्भात प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हॉकीचे अॅस्ट्रोटर्फ मैदान तयार करून त्यातून नागपूर शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खेळातून व्यक्तित्व विकास साधने हे ध्येय : ना. नितीन गडकरी
खेळातून व्यक्तित्वाचा विकास होतो आणि त्यातून कर्तृत्व निर्माण होते. शहरातील प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी उत्तम मैदाने तयार करून देउन त्यातून त्यांच्या व्यक्तित्व विकासाला चालणा देणे हे ध्येय असल्याचे यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व खेळाडू, क्रीडा महर्षी, क्रीडा भूषण पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या विशेष प्रयत्नाने तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातील क्रीडांगणांसाठी ५० कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यातून अनेक मैदानांमध्ये व्यवस्था उभारण्यात आली आहे. नागपूर शहरातील किमान ३०० मैदाने उत्तम करून त्यावर रोज सकाळ, सायंकाळी १ लाखावर तरुण, महिला, ज्येष्ठ सर्वांनी खेळावे, अशी इच्छा असल्याचे ना. नितीन गडकरी म्हणाले. शहरातील सर्व मैदाने उत्तम करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी सर्व मैदानांसाठी वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या उत्तम आयोजनासाठी महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वातील चमूने केलेल्या कार्याचे ना.गडकरी यांनी कौतुक केले. माध्यमातून १५ दिवसात सुमारे ६० हजार खेळाडूंनी विविध खेळांमध्ये कामगिरी केली. ५००० पंच व ऑफिशियल्सने महत्वाची भूमिका बजावली. शहरातील जनतेनेही विविध मैदानांमध्ये उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र खेळात क्रमांक एकवर येईल : ग्रेट खली
आज हरियाणा खेळात देशात क्रमांक एकवर आहे. नागपूर शहराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन मोठे नेते मिळाले व दोन्ही नेते खेळासाठी प्राधान्याने दुरदृष्टीकोन ठेवून कार्य करीत आहे. या दोन्ही नेत्यांच्या खेळासाठी असलेल्या कार्यामुळे लवकरच महाराष्ट्र खेळात क्रमांक एकवर येईल, असा विश्वास डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन ग्रेट खली यांनी व्यक्त केला.
मंचावर बोलण्यासाठी पुढे येताना गेट खलीने भारत माता की जय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील रस्ते विदेशातील रस्त्यांसारखे बनवले. याशिवाय विदेशात पाहिलेला डबल डेकर पूल नागपूर शहरात अनूभवताना आनंद झाल्याचेही ते म्हणाले. खेळासाठी १०० कोटी मिळायला अनेक वर्षे लागतात मात्र एकाच मंचावर काही मिनिटातच खेळाच्या विकासाठी १०० मिळाल्याचे पाहणे ही मोठी बाब असून यासाठी नागपूर शहरातील नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले. ग्रेट खली यांनी खेळाडूंना खेळाचे व्यसन हेच सर्वात मोठे व्यसन असल्याचा मंत्र दिला.
अंकित तिवारींची एंट्री आणि स्टेडियममध्ये जल्लोष
सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक आणि सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार पटकाविणारा अंकित तिवारी यांनी आपल्या खास शैलीत मंचावर एंट्री केली आणि उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात आपल्या गाजलेल्या गीतांनी अंकित तिवारीने नागपूरकरांना रिझविले. अंकित तिवारी आणि त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आलेल्या गीतांवर तरुणाईने ठेका धरला.
विजय मुनीश्वर यांना क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान
क्रीडा महर्षी पुरस्कार द्रोणाचार्य आणि छत्रपती पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ लक्ष रूपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करून ना.नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रेट खली व अन्य मान्यवरांनी मुनीश्वर यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा सन्मान केला.