प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे सूक्ष्म नियेाजन करावे – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त राहावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ याविषयावर थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रत्येक शाळेत थेट प्रसारण करावयाचे असून शिक्षण विभागाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.

मंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी बालभवन, मुंबई येथून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते, शिक्षण आयुक्त सुरजकुमार मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले, की ‘परीक्षा पे चर्चा’ च्या पार्श्वभूमीवर राज्यात 25 जानेवारी 2023 रोजी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेचेही नियोजन शिक्षण विभागाने करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत. या चित्रकला स्पर्धेसाठी विविध दहा विषय असतील. या स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांसह दहा उत्तेजनार्थ व 25 इतर विशेष बक्षिसे देण्यात येतील. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांनाही निमंत्रित करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधान सचिव देओल यांनी सांगितले की, शिक्षणाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चित्रकला स्पर्धेचे परिपूर्ण नियोजन करावे. या स्पर्धेसाठी अडीच तासांचा वेळ असेल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून त्यांची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी.

यावेळी झालेल्या चर्चेत शिक्षण आयुक्त मांढरे, संचालक दिवेगावकर यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत ‘हॉप ऑन - हॉप ऑफ’ बस सेवेचा शुभारंभ

Sat Jan 21 , 2023
पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मुंबई : पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर ‘हॉप ऑन – हॉप ऑफ’ बसची सुविधा आज सुरू केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!