– केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्र प्रदान
नागपूर :-आज नागपूरमध्ये भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्था , भारतीय खाण ब्युरो , आयकर , डाक विभाग, सांख्यिकी विभाग , कर्मचारी भविष्य निधी संघटन , एम्स , कर्मचारी विमा महामंडळ , केंदीय प्रत्यक्ष कर मंडळ या केंद्र शासनाच्या विविध 14 विभागात नोकरी मिळालेल्या 108 उमेदवारांना रोजगार मेळा अंतर्गत नियुक्ती पत्र दिले जात आहे .
भारताच्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असून देशाला विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे , असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज नागपुरात केले . याप्रसंगी नागपूर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त के.एम. बाली, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी –एनएडीटीचे प्रधान महासंचालक संजय पुरी , ईपीएफओचे आयुक्त शेखर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून देशभरात 71 हजार नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम झाला .त्यावेळी नागपूरातील राजनगरस्थित राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय –एनएफएससी येथील सभागृहात अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र वितरण झाले . याप्रसंगी चौबे यांच्यासह आयकर , ईपीएफओ , वस्तू सेवा कर विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी पंतप्रधानांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण बघितले . या मेळ्यात आयकर, वस्तू सेवा कर, ईएसआयसी, डाक विभाग, रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.