विविध क्षेत्रात अग्रेसर महिलांचा अभिमान  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यटन विभाग व इंडियन ऑइलतर्फे प्रकाश व ध्वनी कार्यक्रम संपन्न

मुंबई : सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा किंचितही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.           आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइलच्या संयुक्त विद्यमाने आज रात्री गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित विशेष मल्टी मीडिया प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास, महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जी 20 महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, विपणन संचालक व्ही. सतीशकुमार, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. एस. कुंदन, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, संचालक डॉ.बी. एन. पाटील, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामाच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात.त्यामागे त्यांचा त्याग असतो. महिलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सहकार्याने राज्यात विकास योजना राबविण्यात येत आहेत. अलिकडेच केंद्रीय नगरविकास विभागातर्फे १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री पुरी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अतुलनीय आहे. हा पराक्रम प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र ही कर्तृत्ववान महिलांची भूमी आहे. महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन आणि स्त्रियांचा सन्मान ही नवीन भारताची ओळख आहे. सन २०४७ पर्यंत भारताला विकसित देश म्हणून घडवायचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्रातील महिलांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. पुरेचा, इंडियन ऑइलचे अध्यक्ष वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आभार मानले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन २०१३- १४, सन २०१४- १५, सन २०१५- १६, २०१६- १७, २०१७- १८ या कालावधीतील राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये नूरजहाँ बेगम हमीद अब्दुल हमीद पांडे (जि. वाशीम), वासंती संपतराव महामुलकर (जि. सातारा). हर्षदा विद्याधर काकडे (जि. अहमदनगर), वनमाला परशुराम पेंढारकर (जि. वाशीम), शोभा गुंडप्पा पारशेट्टी (जि. लातूर) यांचा समावेश होता. कोकण विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयंसेवी संस्था अशा : श्री सद्गगुरू सदन वाचनालय व अभ्यासिका, घाटकोपर, मुंबई. वनवासी विकास सेवा संघ, उसरोली, मुरुड, जि. रायगड. सहेली ग्रुप, राधाकृष्ण सहनिवास, वडनाका बापटआळी, चिपळूण, जि. रत्नागिरी, आश्रय सोशल फाऊंडेशन पनवेल, जि. रायगड.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com