रिक्त पदभरती प्रकिया राबविणार
नागपूर : अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल तसेच रिक्त पदभरतीसंदर्भात तात्काळ कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागाच्या अंतर्गत असलेले मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात तीन महिन्यात कार्यवाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशी माहितीही मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
लक्षवेधी सूचनेवरील या चर्चेत सदस्य अबू आझमी, आमिन पटेल, नितेश राणे यांनी सहभाग घेतला.