राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचे आणि राजकीय विश्लेषकांचे विशेष मार्गदर्शन…
शेतकऱ्यांची दिवाळी दु:खात ;सरकार दिलासा देण्यात अपयशी – जयंत पाटील
अहमदनगर : – अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांची दिवाळी दुःखात गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, त्यांना दिलासा द्यायला हवा होता. मात्र तसे होताना दिसले नाही. सरकारमध्ये गतीमानता दिसत नाही हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिर्डीमध्ये ४-५ नोव्हेंबरला ‘राष्ट्रवादी मंथन… वेध भविष्याचा’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यास शिबीर होत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या शिबिरामध्ये सकाळी १०.१० ला झेंडावंदन झाल्यावर स्वागत व प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेतृत्व व ओबीसी आरक्षण, आरोग्य विषयावर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे,गृहनिर्माण विभागातील महाविकास आघाडीचे निर्णय यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, तर सामाजिक न्याय विभागाबाबत धनंजय मुंडे, संघटना बांधणी आढावा यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तर पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
मिडिया आणि सोशल मीडिया यावर खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या निर्मितीची गोष्ट – ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, जागतिक आर्थिक परिस्थिती व भारतीय अर्थव्यवस्था – ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, अल्पसंख्याक विभागाबाबत – सुभान अली शेख, केंद्रीय यंत्रणांचा राजकारणासाठी वापर – राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, धर्माचे वाढते राजकारण व देशातील सद्यस्थिती – राज्यसभा सदस्य कुमार केतकर, आयडिया ऑफ इंडिया – लोकमत संपादक (पुणे) संजय आवटे, सांस्कृतिक राजकारण – राजकीय विश्लेषक विजय चोरमारे, विविध सामाजिक घटकांचे आरक्षण – पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके आदींचे मार्गदर्शन होणार आहे. तर शेवटी आदरणीय शरद पवारसाहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
भाजपने टोळीबरोबर आघाडी केली आहे, पक्षाबरोबर नाही. ज्यादिवशी शिंदे गटाचा उपयोग संपेल त्यादिवशी त्यांना सोडण्यात येईल. सत्तांतराचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे यासरकारचे कधीही काहीही होऊ शकते. निवडणुका कधीही लागू शकतात आम्ही तयारीत आहोत असे जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. राष्ट्रवादी तळागाळात असल्याने हे शक्य झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
स्वतःच्या विजयाबद्दल सरकारला आत्मविश्वास नाही, खोक्यांचा वाद अजून मिटत नाही, मंत्रिमंडळाच्या विस्तारापर्यंत थांबू असा १०-१२ आमदारांचा निरोप आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर निर्णय घेऊ असे आमदार खाजगीत बोलतात असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्य विविध परीक्षात उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात कधी नियुक्ती पत्र वाटण्याचे कार्यक्रम घेतले गेले नाही इतकी नामुष्की सरकारवर ओढवली आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
भिडेंचा निषेध करावा तितका कमी आहे. एखाद्या महिलेला असे बोलणे योग्य नाही. कोणत्याच व्यक्तीला हे न पटणारे आहे. कुंकू लावावे की नाही ते त्या महिलाचे वैयक्तिक प्रश्न आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे शिबीर शिर्डीत झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले असे खासदार सुजय विखे यांचे म्हणणे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीत शिबीर संपन्न झाल्यानंतरही आताचे सरकार पडेल असा दावा करतानाच आपल्या गावाबाबत असे बोलणे विखे यांना शोभतं का ? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी केला.
आज पंतप्रधान मोदी यांनी गुंतवणूकीची घोषणा केली. गुजरात राज्याच्या आज निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आता तिथे आचारसंहिता लागू झाली आहे. आधीच या सरकारने मोठे प्रकल्प तिकडे नेले आहेत. आता तिकडे काही नेऊ शकत नाही म्हणून आज घोषणा केली गेली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.