त्रिशरण पंचशील व 22 प्रतिज्ञा
नागपूर :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना धम्मदीक्षा दिली. या दिनाचे औचित्य साधून आणि आठवण म्हणून दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू व भिक्खुनी संघाने दीक्षाभूमी येथे त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा उपस्थित बांधवांना दिली.
ससाई यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्तुपाच्या आत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या अस्थिकलशावर पुष्पवर्षाव करून त्रिशरण पंचशीलचे पठन केले. यावेळी ससाईंनी दीक्षाभूमी परिसरात 50 अनुयायांना धम्मदीक्षा दिली.
तत्पूर्वी इंदोरा बुद्धविहार, संविधान चौक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी भिक्खू संघाचे भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप यांच्यासह भिक्खुनी संघांचे संघाप्रिया थेरी, धम्म सुधा, बोधी शीला थेरी, विशाखा, पारमिता, उप्पला वर्ना, सुमेधा (श्रामणेरी), धम्मानंद (श्रामणेरी), वनप्रिया (श्रामणेरी) उपस्थित होत्या.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातील लाखो अनुयायी दीक्षाभूमीहून विचारांची ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात आणि प्रगतीचे शिखर गाठतात. या दिवसाला होणारी गर्दी पाहता स्थानिक बांधव 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर येतात. मात्र, या दिवशी समितीतर्फे अधिकृत कार्यक्रमाचे आयोजन नसते.
शुक्रवार 14 ऑक्टोबरला सकाळपासूनच अनुयायांची पावले दीक्षाभूमीकडे वळली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून कुटुंबासह दीक्षाभूमीवर पोहोचले. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेऊून बांधवांनी बोधी वृक्षाच्या छायेत दिवस घालविला. नेहमीप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबेडकरी साहित्याची दुकाने सजली होती. विविध प्रकारच्या बुद्ध मूर्ती, साहित्यांची दुकाने होती. पंचशील ध्वज, निळी टोपी घातलेले उपासक-उपासिका, धम्मबांधव आणि अनुयायांची सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती.