– विदर्भातील वैशिष्टपूर्ण प्रदर्शन; विविध स्पर्धा आणि कार्यशाळा
नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठान चार भव्य प्रदर्शनानंतर पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 , 22 ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित आहे. नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने हे भव्य आगळे वेगळे प्रदर्शन साकार होत आहे, अशी माहिती अनिल सांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, या प्रदर्शनाला त्या प्रदर्शनामध्ये तीन भाग आहेत 1)अन्नपूर्णा खाद्य दालन 2)भारतीय पारंपरिक कारागीर कलाकार यांच्यासाठी आर्टिझन गॅलरी 3) सेवा संस्था / एनजीओ, छोटे उद्योजक स्टार्टअप, शेतकरी, महिला, यांच्याकरिता सेवा दालन. लोकल व्होकल करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन ग्रामायण प्रतिष्ठान करीत असते. सेवा प्रदर्शनात ग्रामीण भागातील तसेच स्वनिर्मित उद्योजकांना प्रथम संधी दिली जाते. 20 ते 25 हजारावर ग्राहक प्रदर्शनाला भेट देतात. चोखंदळ ग्राहक आणि भक्कम विक्री हे ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य. पाच दिवस भरगच्च कार्यक्रम असतील. प्रदर्शनादरम्यान जुगाडू इंजिनियर्स स्पर्धा, महिला मंडळ स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक समाज योद्धा स्पर्धा, सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा सत्कार, अशा स्पर्धा घेण्यात येतील. प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे. सुमारे 140 स्टॉल यावर्षी प्रदर्शनात राहणार आहेत.
सेवा संस्था व समाजकार्य महाविद्यालय सेवा संस्था (NGO), प्रतिनिधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य/प्रतिनिधी यांच्यासाठी 22 डिसेंबर रोजी उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर लगेच संवाद सत्र आयोजित केले आहे.
दि. 23 डिसेंबर 2023 रोजी उद्योजक कारागीर यांच्याकरता एमएसईमी च्या सहकार्याने दिवसभराच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
24 डिसेंबर 2023 | वेळ दुपारी 12 ते 2.30 वाजता सेंद्रीय कृषी, जलसंधारण व पर्यावरण कार्यकर्ता नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नविन निवडून आलेले ग्रामपंचायत प्रतिनिधी, सेंद्रीय शेती प्रयोग व प्रचार करणारे कार्यकर्ते तसेच स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ति व तसेच ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन व पाणी जिरवण्याच्या पद्धती (Rainwater Harvesting) जंगल व कृषी संबंध इत्यादी विषयांवर तज्ञ व कार्यकर्ता यांच्यात संवाद होतील.
दि. २४ डिसेंबर २०२३ ला दु. २.३० वाजता प्रदर्शन स्थळावर महिला मंडळांसाठी समयस्फूर्त भाषण स्पर्धा होईल. या स्पर्धेनंतर उपस्थित महिलांसाठी वैयक्तिक प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल व पुरस्कार दिले जातील. सामाजिक क्षेत्रात सक्रिय, नेतृत्व करणाऱ्या निवडक ५ महिलांचा सत्कार यावेळी करण्यात येईल.
ग्रामायण प्रदर्शनातला सोमवार, २५ डिसेंबर हा दिवस ज्येष्ठांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या दिवशी गतिमान व स्वस्थ ज्येष्ठ ही जलद चालण्याची स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि समयस्फुर्त भाषण स्पर्धा, अशा तीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या दिवशी 75 वरील वर्षावरील पुरुष आणि 70 वर्षावरील महिला ज्या सातत्याने समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत, अशा निवडक तीन ज्येष्ठ समाजयोद्धांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
ग्रामायण प्रतिष्ठान जुगाडू इंजिनिर्स स्पर्धा २०२३ दुसऱ्या वर्षी पण आयोजित केली आहे. ग्रामायण प्रतिष्ठान समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सर्जनशील जुगाडू इंजिनिर्सचा शोध घेत आहे. बक्षीस समारंभ दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2:30 होणार आहे.
पाश्चात्य संस्कृतीत मुलं निरोगी राहावे, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत 11 शाळांनी सहभाग घेतला. प्रश्न मंजुषा 2 भागात घेण्यात आली. पहिला स्तर म्हणजे मुलांना 20 प्रश्न असलेली पर्यायवाचक प्रश्नपत्रिका देण्यात आली. प्रत्येक शाळेतून 10 मुलं निवडण्यात आली. त्या मुलांना व शिक्षकांना 100 रु चे फुड कुपण देण्याचे ठरले. त्या मुलांसाठी पुन्हा एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्या 100 मुलांमधील 3 मुलाची निवडण्यात करण्यात आली. त्या मुलाचा सत्कार ग्रामायण प्रदर्शनात 23 तारखेला करण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे हे समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांचा उत्साह वाढवावा असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.
पत्रपरिषदेला ग्रामायण प्रतिष्ठान अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, राजू काळेले, चंद्रकांत रागीट, अनुराधा सांबरे, रमेश लालवाणी, मंजुषा रागीट, सुरेखा सराफ, डॉ. प्रकाश गांधी, जयश्री अलकरी, प्रशांत बुजोने, राजेंद्र काळे, मिलिंद गीरीपुंजे, नरेंद्र गिरीधर, किशोर केळापूरे, माधुरी केलापुरे, विलास खनगन यांची उपस्थिती होती.