नागपूरमधील आरोग्य सुविधांसाठी 507 कोटी रुपये तत्काळ उपलब्ध करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र

Ø नागपुरातील विविध प्रकल्पांच्या कामांना गती

नागपूर :- नागपूरमधील मेडिकल, मेयो आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी 639 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील काही निधी दिला आहे, तर उर्वरित 507 कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नागपुरातील विविध प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले.

नागपुरातील 615 खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पीटलचे काम सुद्धा तत्काळ सुरु करा, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी 60 कोटी रुपये तत्काळ देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करा, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथिगृह येथे नागपूरमधील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रशासनाने प्रकल्प पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा, खसरा येथे तीनशे खाटाच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाच्या विकास कामाची, महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती या संस्थेची खसरा, सिताबर्डी येथे रिसर्च सेंटर, तसेच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडा, पुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. नासुप्रच्या 716 कोटींच्या मलजल प्रकल्पाच्या निविदा सुद्धा तत्काळ जारी करा, असे त्यांनी सांगितले.

इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकाम ही तातडीने सुरु करुन हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले. याशिवाय, अजनीतील ओबीसी भवन, संत सावतामाळी भवन, शिवसृष्टी, बख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरण, टेकडी गणपती तीर्थक्षेत्र विकास, या प्रस्तावित प्रकल्पांचाही आढावा त्यांनी घेतला. विसर्जन कुंड, नंदग्राम प्रकल्प, पोहरा नदी शुद्धीकरण, नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, देवडिया रुग्णालय, प्रभाकरराव दटके रुग्णालय, रामझुला, अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या भागाची दुरुस्ती अशा सर्व कामांचा त्यांनी आढावा घेतला. नागपूर शहरातील क्रीडांगणे, खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.

बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, तसेच इतर संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डागा रुग्णालयात जागतिक सिकलसेल दिन साजरा

Thu Jun 20 , 2024
नागपूर :- जागतिक सिकलसेल दिनानिमित्त डागा स्त्री रुग्णालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांचे हस्ते झाले. यावेळी डागा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. यावेळी रांगोळी, पोस्टर मेकिंग, हैड्रोक्सियुरिया वाटप, दहावीत 88% घेणाऱ्या सिकलसेल रुग्णाचा सत्कार, रॅलीचे आयोजन, सिकलसेल रुग्ण व वाहकाना मार्गदर्शन, नर्सिंगचे विद्यार्थी, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com