चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या ३२ बांधकामांवर कारवाई करून ४८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद सुद्धा देण्यात आली आहे.
वायु आणि विविध प्रकारचे प्रदूषण यामुळे श्वसनासंबंधी व इतर आजार उद्भवतात. यास कारणीभुत घटकांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने मा.उच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. यात शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरु असतात, ही बांधकामे सुरु असतांना त्यात वापरण्यात येणाऱ्या विटा, रेती, सिमेंट, गिट्टी, व इतर साहित्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास व पर्यायाने वायू प्रदूषण होत असल्याचे दिसून येते.
वास्तवीक कोणत्याही इमारतीचे बांधकाम सुरु असतांना सदर स्थळाच्या चारही बाजूस खालच्या भागापासून ते बांधकामाच्या उंचीपर्यंत ग्रीन नेटचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यायोगे बांधकाम साहित्यामुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास इतरांना होणार नाही.यापुढे अश्या बांधकामांवर सक्त कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे डेब्रिजची वाहतुक न करता त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत.मा. उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार आता अशा घटकांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.