– श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन आणि आयपीएएफचा उपक्रम : बजाजनगर ते लक्ष्मीनगर भव्य शोभायात्रा
नागपूर :- सोमवारी २२ जानेवारीला श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून श्री. सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन व इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल (आयपीएएफ) / उत्तिष्ठ भारत सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदानात तब्बल ४ हजार फुट आकारात श्रीराम मंदिराची भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. सोमवारी २२ जानेवारी रोजी बजाजनगर बास्केटबॉल मैदानात सकाळी ९.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भव्य रांगोळीचे उद्घाटन होईल. याप्रसंगी डॉ. विलास डांगरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
सोमवारी (ता.२२) सायंकाळी ५ वाजता बजाजनगर राम मंदिर ते पूर्व लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल मैदानापर्यंत भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामाची पालखी, ढोलताशा पथक, डीजे धुमाल, फटाका शो, लेझिम पथक, बाहुबली हनुमान, श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या वेशभूषेसह आकर्षक रोषणाई हे प्रमुख आकर्षण असणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता पूर्व लक्ष्मीनगरातील व्हॉलिबॉल मैदानात २५ हजार भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका कोमल निनावे यांचा भक्तीगीताचा कार्यक्रम देखील सुरू राहणार आहे.
या अभूतपूर्व सोहळ्याला जास्तीत जास्त श्रीराम भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीराम सेवा समितीच्या वतीने माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.