– क्रीडा चॅम्पियनशिप ‘ पुसागोंदी’ तर सांस्कृतिक चॅम्पियनशिप ‘दुधाळा ‘ शाळेला
– तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न
– येनवा गावात अवतरली चिमुकल्यांची पंढरी
काटोल :- विद्यार्थी हा समाजाचा आरसा असल्यामुळे समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नवदिशा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करीत असतात.जि.प. शिक्षक हे पाठ्यपुस्तकातील अनुभवासोबतच जीवन जगण्याची कला विद्यार्थ्यांना शिकवित असतात. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा, सांस्कृतिक व विविध उपक्रमातून बौद्धिक विकासासोबतच भावनिक,मानसिक, नैतिक व सामाजिक विकास होत असतो म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे सर्वगुण संपन्न असतात, असे प्रतिपादन काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण समारंभात येनवा येथे केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजय डांगोरे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्या अनुराधा खराडे, पं.स. सदस्या चंदा देव्हारे, ग्रामपंचायत, येनवा सरपंच ललिता ठाकरे, गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार जनबंधू, शिक्षण विस्तार अधिकारी जावेद इकबाल,प्राचार्य संदीप बोरकर, केंद्रप्रमुख रमेश गाढवे, केंद्रप्रमुख राजू धवड, केंद्रप्रमुख निळकंठ लोहकरे, केंद्रप्रमुख पांडुरंग भिंगारे, केंद्रप्रमुख महेश राकेश, केंद्रप्रमुख सुरेंद्र कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कचारी सावंगा येथील चिमुकल्यांनी सादर केलेले ‘वारकरी संप्रदायाची पंढरीची वारी’ या नृत्याने प्रत्येक्षात येनवा गावात पंढरी अवतरली आणि सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या नृत्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना मुसळे, शिक्षिका सोनाली चव्हाण व उपक्रमशील शिक्षक राजू बगवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत क्रीडा चॅम्पियनशिप ‘ जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पुसागोंदी ‘ शाळा तर सांस्कृतिक चॅम्पियनशिप ‘ जि.प. उच्च प्राथमिक शाळा, दुधाळा ‘ यांना प्राप्त झाली. कबड्डी स्पर्धेत – मेंडकी, कोंढासावळी, दुधाळा सोनोली, खो खो स्पर्धेत – सोनखांब ,वाघोडा खुटांबा, ईसापुर खुर्द , लंगडी स्पर्धेत – पुसागोंदी व गोंडीमोहगाव, रिले रेस स्पर्धेत – पुसागोंदी शाळा अव्वल ठरलेली आहे. तसेच सांस्कृतिक स्पर्धेतील समूह गीतगायन स्पर्धेत – दुधाळा , समुहनृत्य स्पर्धा कनिष्ठ गट – कचारी सावंगा व समूहनृत्य स्पर्धा वरिष्ठ गट -ईसापुर खुर्द शाळेने विजेतेपद पटकाविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी जावेद इकबाल, संचालन निलेश पोपटकर व योगेश चरडे तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख राजू धवड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जि.प. शिक्षकवृदांनी सहकार्य केले.