– उत्कृष्ट रील होणार अधिकृत रील म्हणून प्रसिद्ध : २४ मार्चपर्यंत स्पर्धा
नागपूर :- नागपूर शहर आणि जिह्यामध्ये मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (स्वीप) प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. तरुणांनो, मतदार जनजागृतीसाठी रील तयार करा, ते सोशल मीडियावर अपलोड करा आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवतींना केले आहे.
नागपूर जिल्हयामध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘मिशन डिस्टिंक्शन’ ७५ टक्के पेक्षा जास्त मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे तसेच नवमतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी रील तयार करणे स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेसाठी ‘मेरा पहला वोट देश के लिए’ (माझे पहिले मत देशासाठी) आणि ‘आय एम अ प्राउड वोटर’ (मला मतदार असल्याचा अभिमान आहे) हे दोन विषय निश्चित करण्यात आलेले आहेत. यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांना रील तयार करणे आवश्यक आहे. स्पर्धेमध्ये १८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना सहभागी होता येईल. स्पर्धेसाठी अंतिम तारीख २४ मार्च असून सर्वाधिक लाईक्स आणि व्हिवर्स असलेल्या रीलला अधिकृत रील घोषित करून प्रसिद्ध केले जाईल.
स्पर्धकांनी तयार केलेले रील आपल्या सोशल मीडियावर (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) अपलोड करताना #ChunavKaParv, #DeshKaGarv, #VoteKarega Nagpur, #Mera Pehla VoteDeshKe Liye या हॅशटॅगचा वापर करणे अनिवार्य आहे तसेच फेसबुकवर deonagpur, इंस्टाग्रामवर deo_nagpur आणि एक्स अर्थात ट्विटरवर deo_nagpur या पेजला टॅग करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sveepngp2024@gmail.com या ईमेलवर रीलसह सविस्तर माहिती पाठवावी किंवा https://forms.gle/qjPbRf2Q4C1abkAG9 या लिंकवरून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालय, मनपा आणि जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.