‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमातून महिलांविषयक गुन्हेगारीला बसेल प्रतिबंध – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे. महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील 30 विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा आणि तालुकास्तरावर व्याप्ती वाढवावी, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्रॅफिकिंग (अॅक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री तटकरे बोलत होत्या.

यावेळी या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, उत्कर्षा रुपवते, सामाजिक संस्थेचे महेश ठाकरे यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिला व बालकांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. सुरक्षित वातावरणात प्रत्येकाला आपला विकास करता यावा यासाठी गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, ‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमासाठी राज्य महिला आयोग त्यांच्यामागे खंबीर पणे उभे राहील. जेणेकरून एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती तक्रार पोलीस स्थानकामध्ये दाखल करून न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करता येतील.

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना होऊच नयेत यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे, यामध्ये प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. अशा घटना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही आवश्यक बाब आहे. युवक – युवतींनी जनजागृती पर उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यास अशा अनेक घटना रोखण्यासाठी मदत होऊ शकते, असेही मंत्री तटकरे म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग महिलांच्या विविध प्रश्नांसाठी काम करत आहे. राज्य महिला आयोगाच्या मदतीने 24 मुलींची ओमान मधून सुटका करून त्यांना महाराष्ट्रात आणले आहे. महिलांनी अत्याचाराच्या घटनांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अलीकडे सायबर क्राइमचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मीडियावरून केले जाणारे ट्रोलिंग अथवा फसवणुकीच्या विरोधात तक्रार सायबर पोलिसांकडे जाऊन महिला तक्रार देऊ शकतात. संकट समयी मदतीसाठी महिलांना 1091 हा टोल फ्री क्रमांक आहे. राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने ससून हॉस्पिटल येथे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले आहे. विधवा महिला, बालविवाह, हुंडा प्रथा अशा अनेक महिलांच्या प्रश्नांवर महिला आयोग काम करत आहे. राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम सर्वांसाठी एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी मदत करेल, असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर यांनी मार्गदर्शन केले. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती जोशी-शर्मा यांनी आयोग मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. ‘यंग इंडिया अनचेन्ड’ नागपूरचे सदस्य यशदा कटारिया व अमरधाम कुटे यांनी मनोगत व्यक्त केले.

अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्रॅफिकिंग (अॅक्ट) या अंतर्गत प्रकृती ट्रस्ट, युवा रुरल असोसिएशन, प्रथम, विप्ला फाउंडेशन अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार - मंत्री दीपक केसरकर

Fri Oct 6 , 2023
मुंबई :- भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे, कारण ते परिवाराचा आधारवड असतात. ज्येष्ठांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षित, आरोग्य सुविधायुक्त वातावरण देण्यासाठी शासन कायम त्यांच्या पाठीशी आहे. मुंबई शहरात महिनाभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com