– चारगाव तलावातील अमृत सरोवरावर जागतिक योग दिवस साजरा
नागपूर :- आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढलेला तणाव घालविण्यासाठी रोज योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अजय गुल्हाने यांनी केले. काटोल येथील चारगाव तलाव अमृत सरोवर येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आली. राज्यात ३ हजार ५६ अमृत सरोवारांची कामे पूर्ण झाली असून जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून या सरोवारांच्या ठिकाणी योगा दिवस साजरा करण्याचे आवाहन मनरेगा आयुक्तांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते. त्यानुषंगाने आज नागपूरातील काटोल येथील अमृत सरोवरावर मनरेगा आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्याद्वारे योग दिवस साजरा करण्यात आला.
याप्रंसगी मनरेगाचे उपायुक्त सुबोध मोहरील, सहाय्यक संचालक प्रशांत ढाबरे, विस्तार अधिकारी सुनिता भोले, लेखा अधिकारी अश्विनी पात्रिकर, नायब तहसीलदार शिला भुसारी तसेच जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, पंचायत समिती काटोल सभापती संजय डांगोरे, गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर, चारगाव ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी बागडे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक म्हणून पंचायत समिती परशिवणी येथील कृषी अधिकारी सी. एस. देशमुख यांनी योगाभ्यासात सहभागी झालेल्यांकडून विविध योगासनांचा सराव करवून घेतला व रोजच्या जीवनात योगा केल्यामुळे शरीराला होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली.
अमृत सरोवराचा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, निसर्गरम्य व आध्यात्मिक एकरुपतेचे उत्तम प्रतिक असल्याने येथे योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिवस येथे साजरा करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. केवळ योगदिनानिमित्त योगा न करता योगाभ्यास हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याचे आवाहन देखील सहभागी झालेल्या लोकांना आयुक्तांनी केले. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनीही योगाभ्यासात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.